बदलापूरः बदलापूर शहरात झालेल्या विजेच्या खेळखंडोब्यामुळे बदलापुरकर हतबल झालेले असतानाच आता पाणी पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होतो आहे. त्यामुळे महावितरणाच्या कारभाराचा जाब विचारण्यासाठी बुधवारी बदलापूर शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्याचे दालन गाठले. त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांची विविध मुद्द्यांवर खरडपट्टी काढली. यावेळी समस्यांचा पाढाच भाजप पदाधिकाऱ्यांनी वाचला. येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत झाला नाहीतर मोठे आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही यावेळी भाजपच्या वतीने देण्यात आला.
बदलापूर शहरातील वीज वितरण व्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून कोलमडली आहे. बदलापूर शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्री – अपरात्री, पहाटे कोणत्याही वेळी वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे नोकरदार वर्गाचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच बदलापूरसह अंबरनाथ शहरातील सुमारे पाच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रालाही खंडीत वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे. शालेय विद्यार्थी, पालकांची झोप मोड होत आहे. घरातून काम करणाऱ्या नोकरदार वर्गालाही याचा त्रास सहन करावा लागतो आहे. या सर्व परिस्थितीत ग्राहकांना सहकार्य करण्याचे सोडून महावितरणाचे कर्मचारी समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वीज गेल्यानंतर योग्य कारण न सांगणे, तक्रारींसाठी असलेले मोबाईल फोन न उचलणे, तक्रारींसाठी दुसऱ्यांचे क्रमांक देणे अशा गोष्टीही वाढल्याने याविरूद्ध शहरात नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहर भाजपच्या वतीने बुधवारी महावितरणाच्या बदलापुरच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात धडक दिली. यावेळी भाजपचे राजेंद्र घोरपडे, संभाजी शिंदे, शरद तेली, रमेश सोळसे यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर त्यांनी शहरातील वीज समस्यांचा पाढा वाचला. शहरातील महावितरणाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. विजेअभावी पाणी उचल, शुद्धीकरण प्रक्रिया मंदावली असून त्याचा परिणामी जलकुंभावर होतो आहे. जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यात कोणतीही माहिती न देता थकीत विजबिलांच्या कारणावरून मीटर काढले जात आहेत. हे प्रकार बंद करावे असे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. टीओडी मीटरच्या समस्या संपत नाही आणि नागरिकांत विश्वास निर्माण होत नाही तोपर्यंत त्याची सक्ती थांबवा. कर्मचाऱ्यांचे बेजबाबदार वर्तन थांबवा. पू्र्वेतील ज्या अधिकाऱ्याबाबत तक्रारी आहेत त्यांचे वर्तन आठवडाभरात न सुधारल्यास त्यांची बदली करा, अशी मागणी महावितरणाच्या अभियंत्यांकडे करण्यात आली.
तक्रारींचे फोन उचला
शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होतो. त्याचे कारण ग्राहकांना कळवले जात नाही. त्यांच्या तक्रारींसाठी दिलेले क्रमांक उचलले जात नाही. आमचा वेळ संपला दुसऱ्या कर्मचाऱ्यांना फोन करा असे अधिकारी सांगतात, हे प्रकार बंद करा असा इशाराही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली. कल्याणचे अधिक्षक अभियंता हे आठवड्यातून एक दिवस बदलापुरच्या समस्या ऐकण्यासाठी शहरात येणार आहे. तर कार्यकारी अभियंत्यांनीही कार्यालयातील खुर्ची सोडून शहरात समस्यांच्या स्थळी भेट देण्यास सुरूवात करावी, असे आवाहनही यावेळी कार्यकारी अभियंत्यांना करण्यात आले.
दोन दिवस वीज पुरवठा बंद करा पण…
देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली शहरात दररोज कामे केली जात आहेत. ही सगळी कामे आता संपवा. नागरिक संतापले आहेत. वाटल्यास येत्या काळात सलग दोन दिवस संपूर्ण शहराचा वीज पुरवठा बंद ठेवा पण एकदाची काय ती दुरूस्तीचे कामे करून घ्या, अशी उद्विग्न विनंती यावेळी भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांपुढे केली.