संकेतस्थळावरील अश्लील छायाचित्रांप्रकरणी डोंबिवलीत दाखल झालेल्या गुन्हय़ासंदर्भात चौकशीसाठी बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने बुधवारी दुपारी ठाणे पोलीस मुख्यालयात हजेरी लावली. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तिची चौकशी केली. तसेच गुन्हय़ाप्रकरणी तिचा स्वतंत्र जबाबही नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे गेल्या आठवडय़ात सनी लिओनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तिने संकेतस्थळावर स्वत:ची अश्लील छायाचित्रे प्रकाशित (अपलोड) केल्याने लहान मुले तसेच तरुणवर्गामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे शाखेचे म्हणणे आहे. त्यानुसार, लिओनीविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा सायबर गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तपासाकरिता ठाणे पोलिसांनी लिओनीला बोलाविले होते. त्यासाठी पोलिसांनी तिला नोटीस पाठविली होती. त्यानुसार लिओनी, तिचा पती आणि तिचा वकील असे तिघे बुधवारी दुपारी ठाणे पोलीस मुख्यालयात आले होते. तसेच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांची त्यांनी भेट घेतली. तिची वैयक्तिक, तिच्या व्यवसायाविषयी तसेच रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ाप्रकरणी तिचे स्पष्टीकरण आदी माहिती या वेळी पोलिसांनी घेतली.