कल्याण – येथील मुरबाड रस्त्यावरील ब्राह्मण सोसायटीच्या आवारात एका भटक्या कुत्र्याने या सोसायटीतील एका अल्पवयीन मुलावर हल्ला करून त्याला गंभीररित्या जखमी केले आहे. या मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच भागातील अन्य एका रहिवाशाला कुत्र्याने चावा घेतला आहे. या घटनांनी रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. येत्या रविवारी भटक्या कुत्र्यांच्या विषयावर विचार करण्यासाठी ब्राह्मण सोसायटीतील सदस्यांची एक बैठक गणपती मंदिरात सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे. मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत. मुले सोसायटी आवारात, परिसरात खेळतात. बहुतांशी मुलांचे पालक नोकरीनिमित्त कामावर गेलेले असतात. अशा परिस्थितीत श्वान हल्ला, चावल्याची घटना घडली तर पालकांना काम सोडून घरी यावे लागते किंवा नातेवाईकांना पळापळ करावी लागते. हे सगळे प्रकार रोखण्यासाठी नागरिकांकडून पालिका अधिकाऱ्यांना श्वान बंदोबस्ताची मागणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा – डोंबिवलीत ज्येष्ठ नागरिकाला दोन भामट्यांनी लुटले

ब्राह्मण सोसायटीत गुरव कुटुंब राहते. या कुटुंबातील इयत्ता तिसरीमध्ये शिकणारा आर्यन अविनाश गुरव हा बुधवारी सोसायटीच्या आवारात इतर मुलांसोबत खेळत होता. खेळत असताना नेहमीप्रमाणे एक भटका कुत्रा आवारात आला. सोसायटीतील इतर कुत्री त्याच्या मागे लागली. तो बाजुला जाईल असे वाटत असताना त्याने अचानक आर्यनच्या पायच्या मागच्या बाजुला जोराने चावा घेतला. तो रक्तबंबाळ झाला. हा प्रकार पाहून इतर मुले घाबरली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा प्रकार घडल्यानंतर याच भागातील एका रहिवाशाला कुत्र्याने चावा घेतला आहे. या सततच्या प्रकाराने मुरबाड रोड परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षभरात कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागात श्वान चावण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

हेही वाचा – येऊरमधील ‘त्या’ सात बेकायदा बांधकामांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने घेतली दखल; बांधकामाबाबत चार आठवड्यांत म्हणणे सादर करण्याचे निर्देश

श्वानाला जाळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्त्यावरील गॅस कंपनी भागात एका भटक्या श्वानाला काही अनोळखी इसमांनी दोन दिवसापूर्वी ठार मारून त्याला जिवंत जाळले होते. हा प्रकार या भागात भटक्या श्वानांना नेहमीच खाऊ टाकण्यासाठी येणाऱ्या ‘प्लॅन्ट ॲन्ड ॲनिमल वेल्फेअर सोसायटी’चा (पाॅज) कार्यकर्ता पीयूष संतोष पालव (२१, रा. काटेमानिवली, कल्याण पूर्व) याच्या लक्षात आला होता. त्याने ही माहिती तात्काळ ‘पाॅज’ संस्थेचे संचालक नीलेश भणगे, मोहित यांना दिली. तात्काळ ‘पाॅज’चे बचाव पथक घटनास्थळी आले. त्यांनी घटनेची माहिती देऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात श्वानाला जिवंत जाळणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी पीयुष पालव याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हा घृणास्पद प्रकार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.