ठाणे : फुलपाखरांच्या विविध प्रजाती आणि त्यांचे जीवनचक्र समजून घेण्यासाठी ठाण्यातील एका भाऊ- बहिणीने घराच्या बाल्कनीत फुलपाखरू उद्यान साकारले आहे. गेल्या दोन वर्षांत या बाल्कनीत १५० हून अधिक फुलपाखरांचा जन्म झाल्याची माहिती अभिराज कुलकर्णी याने दिली.

ठाण्यातील मानपाडा भागात राहणारा अभिराज आणि त्याची बहीण देवश्री यांना तीन वर्षांपूर्वी आपल्या घराच्या बाल्कनीतील एका झाडावर फुलपाखरांची अंडी आढळून आली. त्यांनी त्यावर लक्ष ठेवले असता सुमारे एक महिन्यानंतर त्याचे फुलपाखरांत रूपांतर झाले. महिनाभराच्या काळात अंडय़ांपासून फुलपाखरू निर्मितीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया त्यांनी अभ्यासल्या. त्यातून त्यांच्यामध्ये फुलपाखरांबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. त्यानंतर त्या दोघांनी फुलपाखरांच्या प्रजाती आणि त्यांचे जीवनचक्र यावर अभ्यास सुरम केला. गूगल, विविध पुस्तकांच्या माध्यमातून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. पर्यावरण विषयातील तज्ज्ञांना भेटून त्यांनी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. त्यावेळी कोणकोणत्या झाडावर कोणत्या प्रजातीचे फुलपाखरू येते, याची माहिती समजली. त्यानुसार २०१९पासून दोघांनी बाल्कनीत त्या रोपांची लागवड सुरू केली.  लिंबू, रुई, अशोका, सोनचाफा, पानफुटी, हरिण वेल यांसारख्या विविध रोपांची लागवड त्यांनी बाल्कनीत केली आहे. या वृक्षांची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी ७० आणि दुसऱ्या वर्षी १०० असे एकूण १५० ते १७० फुलपाखरांचा जन्म झाला असल्याची माहिती अभिराजने दिली.

फुलपाखरांच्या प्रजाती तसेच त्यांच्या जीवनचक्राविषयी केलेले निरीक्षण अभिराजने ‘बटरफ्लाइज ऑफ इंडिया’ या संकेतस्थळावर नोंदविले असून त्याच्या बाल्कनीत जन्माला आलेल्या फुलपाखरांचे छायाचित्रही समाविष्ट करण्यात आले आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अभिराजने सांगितले.

कोणत्या झाडावर कोणते फुलपाखरू?

* लिंबाच्या झाडावर सामान्य प्रजातीचे फुलपाखरू येत असते.

* अशोका, सोनचाफा या वृक्षांवर कामन जय आणि टेल्ड जय ही फुलपाखरे येतात.

* हरिण वेल या वृक्षावर ब्लू टायगर, रुईच्या झाडावर प्लेन टायगर आणि पानफुटीच्या वृक्षावर रेड पियरो या जातीची फुलपाखरं येतात.