ठाणे : नौपाडा येथील भास्कर कॉलनीमधील अमर टॉवरच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीचा स्लॅब सोमवारी सकाळी कोसळला. या खोलीत अडकलेल्या पाच व्यक्तींना पालिकेच्या पथकाने बाहेर काढले. यातील तीनजण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तळ मजल्यावरील एका खोलीच्या स्लॅबलाही काही प्रमाणात तडे गेले असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याची कार्यवाही पालिकेने सुरू केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नौपाडा येथील भास्कर कॉलनीमध्ये तळ अधिक ७ मजली अमर टॉवर आहे. या इमारतीच्या मजल्यावरील रूम नं. १०१ मध्ये सूर्यवंशी कुटुंब राहते. या खोलीचा स्लॅब सोमवारी सकाळी १०:५७ वाजताच्या सुमारास कोसळला. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. पहिल्या मजल्यावरील खोलीत प्रथमेश सूर्यवंशी (२८), विजया सूर्यवंशी (५४), अथर्व सूर्यवंशी (१४), प्रियांका सूर्यवंशी (२४ ) तर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत शिशिर पित्रे (६० ) असे पाचजण खोलीत अडकले होते. या सर्वांना बाहेर काढण्यात आले असून यातील प्रथमेश, विजया आणि अथर्व हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचाराकरिता पराडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील रिजन्सी अनंतम संकुलातील पाणी टंचाईने रहिवासी हैराण

घटनास्थळी नौपाडा पोलीस, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान उपस्थित होते. तळमजल्यावरील राजा जोशी यांच्या रूम नं. १ या खोलीच्या स्लॅबलाही काही प्रमाणात तडे गेले असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याची कार्यवाही पालिकेकडून सुरू आहे.

More Stories onठाणेThane
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Building slab collapsed in thane five people trapped in the room were rescued by the municipal team ssb
First published on: 15-05-2023 at 14:45 IST