डोंबिवलीत मंजुनाथ शाळेजवळ बुलेटला आग जीवितहानी नाही

डोंबिवली पूर्वेतील टिळक पुतळा ते पाथर्ली नाका दरम्यानच्या मंजुनाथ शाळा परिसरातील रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या एका बुलेटला सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता अचानक आग लागली.

डोंबिवलीत मंजुनाथ शाळेजवळ बुलेटला आग जीवितहानी नाही
डोंबिवलीत मंजुनाथ शाळेजवळ बुलेटला आग.

डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील टिळक पुतळा ते पाथर्ली नाका दरम्यानच्या मंजुनाथ शाळा परिसरातील रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या एका बुलेटला सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता अचानक आग लागली. आगीत बुलेट जळून खाक झाली. आग लागताच जवळच्या एका दुकानदाराने बादल्यांमधून पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

आग विझविण्याचे काम सुरू असताना डोंबिवली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग विझली, असे अग्निशमन दलाचे पथकप्रमुख गोवारी यांनी सांगितले. टिळक रस्ता ते घरडा सर्कल हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता बौध्द युवक मित्र मंडळाच्या प्रवेशद्वार फलका समोर एक बुलेट वाहन मालकाने उभी करून ठेवली होती. आजुबाजुने वाहनांची वर्दळ सुरू होती. पादचारी, इतर वाहन चालकांना काही कळण्याच्या आत बुलेटला अचानक आग लागली. रस्त्यावरील इतर वाहन चालक जागीच थांबले. त्यामुळे काही वेळ या भागात वाहन कोंडी झाली. या भागातील तैनात वाहतूक सेवकाने आग कमी होताच वाहतूक सुरळीत केली.

बुलेटला आग लागून इंधन टाकीचा स्फोट होण्याची शक्यता असल्याने पादचारी, आजुबाजुचे दुकानदार लांब अंतरावर जाऊन उभे राहिले होते. एका चायनिज दुकानदाराने दुकानातील भरलेल्या पाण्याच्या बादल्या पेटलेल्या बुलेटवर ओतल्या. त्यामुळे आग काही प्रमाणात आटोक्यात आली. अग्निशमन दलाचे जवान माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग विझविण्यात आली होती. बुलेट रस्त्याच्या बाजुला करून ठेवण्यात आली असून आग नक्की कशामुळे लागली हे समजले नाही. असे या भागातील दुकानदारांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bullet fire manjunath school dombivli no casualties road ysh

Next Story
डोंबिवली पलावातील महिलेची वाढीव परतव्याचे आमिष दाखवून फसवणूक
फोटो गॅलरी