अंगावर चादरी घेऊन बदलापूर पूर्वेत पाच चोरट्यांनी एका इमारतीतील घरात एक लाख ६२ हजारांची घरफोडी केली आहे. चोराच्या हालचाली कळताच त्यांना पकडण्यासाठी जाणाऱ्या सुरक्षा रक्षकावर त्यांनी दगड मारत त्याला गुंगारा दिला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरांच्या टोळीने केलेल्या या चोरीनंतर बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे.
बदलापूर पूर्वेतील कात्रप परिसरात शुभ निसर्ग नावाचे गृहसंकुल आहे. या संकुलात २५ जुलै रोजी पहाटे ३ च्या सुमारास ५ चोरटे अंगावर चादरी घेऊन घुसले. त्यांनी ई विंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या हिमांशु उदेशी यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. तिथे त्यांनी २ सोनसाखळी,६ लॉकेट, २ ब्रेसलेट, ४ कानातले, २ पैंजण, ४ चांदीचे कडे, ५ चांदीचे शिक्के, २ चांदीचा पेला आणि २ चांदीची ताटली असा एकूण १ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल चोरला. यानंतर हे चोरटे तिथून पळून जात असतानाच संकुलाच्या सुरक्षा रक्षकाला चोरट्यांची चाहूल लागली. त्यामुळे त्यांना अडवण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकाने केला. मात्र त्यांनी त्याला गुंगारा देत पळ काढला.
यावेळी चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाच्या अंगावर दगड फेकून मारले. या सर्व प्रकार संकुलाच्या आवारात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चादरी घेऊन आलेल्या या चोरट्यांचा शोध घेत आहेत. पाच जणांच्या या टोळीने केलेल्या घरफोडीनंतर बदलापुरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.