परिवहन उपक्रमाच्या वातानुकूलित बस लवकरच रस्त्यावर

वातानुकूलित सेवेसाठीच्या तिकीट दराला शासनाकडून मान्यता मिळाल्याने मीरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील वातानुकूलित बस लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गावरच या बस धावणार असल्याने मुंबईला आता वातानुकूलित प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेतून मंजूर झालेल्या शंभर बसमध्ये दहा वातानुकूलित बसचा समावेश होता. दहापैकी पाच बस गेल्या एक महिन्यापासून तयार स्थितीत आहेत. केवळ वातानुकूलित प्रवासाचे दरभाडे शासनाकडून निश्चित करण्यात आले नसल्याने या बस प्रशासनाने आपल्या ताफ्यात समाविष्ट करून घेतल्या नव्हत्या. परंतु काही दिवसांपूर्वी मंत्रालयात यासंदर्भात एक बैठक झाली. मीरा-भाईंदरसह वसई-विरार व कल्याण-डोंबिवली या महापालिकांच्या प्रवासी भाडे प्रस्तावाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. परिणामी महापालिकेचा वातानुकूलित बससेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मीरा-भाईंदर शहर मुंबईशी संलग्न असल्याने बेस्ट प्राधिकरणाच्या वातानुकूलित प्रवासी भाडय़ाच्या धर्तीवर मीरा-भाईंदरच्या प्रवासी भाडय़ाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. दरनिश्चितीचे अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर वातानुकूलित बस ताफ्यात सामील करण्यात येतील, त्याची नोंदणी व विमा प्रक्रिया पार पाडून त्या शक्य तेवढय़ा लवकर मार्गावर धावू लागतील, अशी माहिती उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी दिली. ही सेवा मुंबई नवी मुंबई यांसारख्या लांब पल्ल्यांच्या मार्गावरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या बस वोल्वो असून त्यात ३२ प्रवासी आसनव्यवस्था असणार आहे.

अत्याधुनिक यंत्रणेद्वारे सेवेवर नजर

परिवहन सेवेतील याआधीचा सावळागोंधळ दूर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. इंटिग्रेटेड ट्रान्स्पोर्ट सिस्टीमद्वारे परिवहन सेवेच्या मुख्य कार्यालयातून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मार्गावर धावणाऱ्या बस वेळवेर निघतात की नाही, त्या निर्धारित ठिकाणी वेळेत पोहोचतात किंवा नाही तसेच त्या आवश्यकतेपेक्षा जास्त वेगाने धावतात का यावर या यंत्रणेमुळे लक्ष ठेवण्यात येणार आहे. यात काही फरक पडला तर तसा संदेश तातडीने संबंधित बसचालकाला दिला जाणार आहे. याव्यतिरिक्त थर्मल तिकीट सेवाही लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे. यंत्राद्वारे देण्यात येणाऱ्या तिकिटांमुळे कागदाचीदेखील बचत होणार आहे.