ठाणे – रक्षाबंधन सणानिमित्ताने ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी शनिवार सकाळपासूनच खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसर खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी फुलून गेला. राखी खरेदी, भेटवस्तू तसेच अनेक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. शिवाय विविध प्रकारच्या मिठाई खरेदीसाठी दुकानांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली. त्यामुळे परिसरातील मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.
भावाबहिणीच्या नात्याची वीण जपणाऱ्या सणासाठी आठवड्याभरापासूनच बाजारपेठा सजल्या होत्या. राखी, भेटवस्तू आणि इतर अनेक गृहोपयोगी वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिक अनेक दिवसांपासून बाजारांमध्ये येत होते. विविध प्रकारच्या राख्या खरेदी करण्यासाठी ही गर्दी पाहायला मिळत होती. बाजारात पारंपारिक राखीबरोबरच लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या राख्या उपलब्ध होत्या. यासोबतच भेटवस्तूच्या बॉक्समध्ये राखीसह की-चेन, पेनड्राईव्ह, मिनी टॉर्च, चॉकलेट बॉक्स, परफ्यूम, पुरुषांचे पाकिट अशा विविध साहित्यांचा समावेश आहे. हे भेटवस्तूंचे बॉक्स ग्राहकांचे विशेष लक्ष वेधत आहेत. तसेच सोने आणि चांदीच्या राख्याही बाजारात विक्रीसाठी होत्या.
रक्षाबंधन साजरा करण्यासाठी गोडधोडाच्या खरेदीकडे ग्राहकांचा जास्त कल होता. नामवंत मिठाईच्या दुकानांमध्ये मिठाई खरेदी करण्यात आली. रक्षाबंधन सणानिमित्त मिठाईच्या दुकानात काजु केसर त्रिवेणी ही नव्याने मिठाई उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यासोबतच पेढ्यांचे विविध प्रकार, घेवर, श्रीखंडाचे, बासुंदी, बर्फी असे अनेक पदार्थ विक्रीसाठी होते.
शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याचे चित्र दरवर्षी दिसून येते. यंदाही हे चित्र कायम होते. शनिवार सकाळपासूनच गोखले रोड, राम मारुती रोड, जांभळी नाका, ठाणे स्थानक परिसरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. या मार्गावरून स्थानक परिसरातील बस वाहतूक सुरू असते. तसेच या भागातील रस्ते आधीच अरुंद आहेत. त्यातच या रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने उभी करण्यात आली होती. यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी झाली होती. यात, टीएमटी गाड्या तसेच रिक्षा देखील अडकून पडल्या होत्या. या कोंडीचा फटका कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनाही बसला.
तीन दिवस सलग सुट्ट्या आल्यामुळे नागरिक अधिक संख्येने आपल्या बहिणीच्या घरी रक्षाबंधन करण्यासाठी निघालेले होते. यामुळे शहरातील विविध मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती. बाजारपेठ तसेच स्थानक परिसरात वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने रस्त्यावर रिक्षा, दुचाकी गाड्यांच्या रांगा लागत होत्या.