शलाका सरफरे ठाण्यातील सार्वजनिक मंडळांचे प्रबोधनात्मक देखावे प्लास्टिकबंदी, केरळचा महापूर, प्रदूषणामुळे भू-जलाची होणारी दुर्दशा या विषयांना हात घालत ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती करणारे देखावे यंदा उभारले आहेत. गणरायासमोर नतमस्तक होणाऱ्या भाविकांच्या मनात निसर्गाची भक्ती रुजवणाऱ्या देखाव्यांचे प्रमाण यंदा जास्त असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षी समाजप्रबोधन करणाऱ्या देखाव्यांची निर्मिती करण्यात येते. अशा देखाव्यांतून भक्तीसोबत मनोरंजन होत असल्याने नामांकित मंडळांच्या गणेशोत्सवाला भाविक हमखास भेट देत असतात. अलीकडच्या काळात काही मंडळांनी रोषणाई, प्रसिद्ध पर्यटनस्थळांची प्रतिकृती आणि भव्य गणेशमूर्ती यांच्यावर भर देत प्रबोधनात्मक देखाव्यांवर फुली मारली असली तरी, अनेक मंडळे आजही जनजागृतीचा वसा धरून आहेत. वर्षभरातील घडामोडींचे प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यांतून उमटते. त्यानुसार, यंदादेखील प्लास्टिक बंदी, राज्यात सुरू असलेली वृक्षलागवड, केरळचा महापूर, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन या विषयांना देखाव्यांत स्थान देण्यात येत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने सांडपाण्याचा निचरा केला जात नसल्याने पाण्याखालील जमिनीचा होणारा ऱ्हास, तसेच केरळमध्ये, मुंबईत ओढवलेली आपत्ती यावर भाष्य करणारा देखावा यंदा श्रीरंग सोसायटी येथील श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळाने उभारला आहे. तसेच समाजमाध्यमांमुळे दुरावलेला संवाद आणि लेखन यावर दृष्टिक्षेप टाकणारे ‘मामाचं पत्र हरवलं’ हा देखावा पोलीस मुख्यालय गणेशोत्सव मंडळाने मांडला आहे, तर अशाच प्रकारे समाजमाध्यमांचे मिळलेल्या वरदानाचा सदुपयोग करा असा संदेश देणारा देखावा महागिरी कोळीवाडय़ातील एकवीरा मित्र मंडळाने मांडला आहे. एकीकडे भारतामध्ये वाढत चाललेली उपासमारी आणि दुसरीकडे हॉटेल्स, लग्न-समारंभांमधून होणारी अन्नाची नासाडी यावर भाष्य करणारा देखावा गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मांडला आहे. ठाण्यातील काही आकर्षक देखावे * जय भवानी मित्र मंडळ, आझादनगर क्र.२, ठाणे (प.) - जलसंवर्धन * कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड, ठाणे (प.) -विजेच्या तारेपासून तयार केलेले मंदिर * जिज्ञासा मित्र मंडळ, दगडी शाळेजवळ, चरई, ठाणे (प.) - खाडी संवर्धन * शिवगर्जना मित्र मंडळ, उथळसर, ठाणे (प.) - बैठय़ा खेळांचे महत्त्व * प्रियदर्शनी गणेश मंडळ, लुईसवाडी, ठाणे (प.)- केरळ नैसर्गिक आपत्ती * नव तरुण मित्रमंडळ, बी.केबिन, नौपाडा, ठाणे (प.) - भारतीय जवान गेल्या काही वर्षांत उत्तराखंड, केरळ, मुंबईसारख्या ठिकाणी निसर्गाचे रौद्र रूप आपण अनुभवले आहे. एवढे होऊनही आजही आपल्या देशात प्रक्रिया न करता पाणी नद्यांमध्ये सोडले जाते. कचऱ्याचा ढीग समुद्राच्या तळात टाकला गेल्याने महापुरासारखी आपत्ती उद्भवते. याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. - प्रमोद सावंत, श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, ठाणे