स्थानिक संस्था कर आणि उत्पादन शुल्काचा भार वाढल्याने यंदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा तुलनेने कमी असल्याची ओरड स्थानिक विक्रेत्यांकडून एकीकडे केली जात असताना या मुहूर्तावर गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एका दिवसात ठाण्यात १७२ वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे. तुलनेने स्वस्त आणि किफायतशीर अशा वाहनांच्या खरेदीचा आकडा मोठा असला तरी जॅग्वार, मर्सिडिज अशा महागडय़ा गाडय़ांची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे.
साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी वस्तू खरेदी शुभ मानली जाते. यामुळे या दिवसाचा मुहूर्त साधून अनेक जण घर, सोने, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे खरेदी करतात. त्यामुळे या दिवशी व्यवसाय तेजीत असतो. मात्र, दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापाऱ्यांनी गुढी पाडव्याच्या खरेदीला कमी प्रतिसाद असल्याची ओरड केली होती. स्थानिक संस्था कर आणि उत्पादन शुल्काचा भार वाढल्याने ठाणे शहरात विकल्या जाणाऱ्या गृहोपयोगी वस्तू     
(पान १वरून) आणि वाहनांच्या किमती वाढल्याचे कारण यासाठी दिले जात होते. मात्र, ठाणेकरांचा वाहन खरेदीकडे असलेला ओढा यंदा दुपटीने वाढल्याचे दिसून आले. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात यंदा गुढी पाडव्याच्या दिवशी १७२ वाहनांची नोंदणी झाली असून त्यामध्ये कारची संख्या १०१  तर मोटारसायकलींचा आकडा ७१ आहे. या वाहनाच्या नोंदणीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये एका दिवसात ५० लाख ५३ हजार रुपये शुल्क जमा झाले आहे. गेल्या वर्षी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात गुढीपाडव्याच्या दिवशी ९८ वाहनांची खरेदी झाली होती. त्यामध्ये ८० मोटारसायकल, १७ कार आणि १ अवजड वाहनाचा समावेश होता.  दुचाकींच्या तुलनेत कार खरेदीत मोठी वाढ झाल्याचे ठाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले. मात्र, ग्राहकांचा ओढा महागडय़ा गाडय़ांऐवजी १० ते १२ लाखांपर्यंतच्या गाडय़ा खरेदी करण्याकडे अधिक असल्याचे दिसून आले, असेही त्या म्हणाल्या.
नीलेश पानमंद, ठाणे