ठाणे : वागळे इस्टेट येथील श्रीनगर भागात एका मोटारीच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी श्वानप्रेमी महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मोटार चालकाविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
श्रीनगर येथे तक्रारदार महिला वास्तव्यास आहे. ती नेहमी परिसरातील भटक्या श्वांनाना खाद्य पदार्थ देत असते. मंगळवारी रात्री एका मोटार चालकाने परिसरातील भटक्या श्वानाच्या अंगावरून मोटार नेली. यात श्वानाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती तक्रारदार महिला आणि त्यांच्या मुलीला मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेतली.
श्वानाचे परिसरात अंत्यविधी केले. तसेच त्यांनी याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मोटार चालकाविरोधात मोटरवाहन अधिनियम, १९८८ चे कलम १८४ आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० चे कलम ११ (१)(१) प्रमाणे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.