मुद्रांक शुल्क घोटाळा
१ कोटीची अफरातफर केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास
कल्याण तालुक्यातील म्हारळ गावच्या माजी सरपंच प्रगती कोंगरे, ग्रामसेवक सादिक शेख यांनी संगनमत करून ग्रामपंचायतीमधील १ कोटी ७ लाखाच्या मुद्रांक शुल्क अनुदानात घोटाळा केल्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडे गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर व घोटाळा केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्याने दोघांवर टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गु्न्ह्य़ाची माहिती मिळताच कोंगरे व शेख फरारी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती टिटवाळा पोलिसांकडून देण्यात आली. म्हारळ ग्रामपंचायतीला तीन वर्षांपूर्वी शासनाकडून १ कोटी १२ लाखाचे अनुदान मिळाले होते. या अनुदानातून गावात विकासकामे करायची होती. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेच्या इतिवृत्तात हे अनुदान फक्त ९ लाख ९९ हजार आल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतरच्या वर्षांत व इतिवृत्तात या अनुदानाच्या आकडय़ांविषयी खेळ करून ते कमी-जास्त दाखविण्याचा प्रताप सरपंच कोंगरे, ग्रामसेवक शेख यांनी केला, अशा तक्रारी आहेत. यामुळे गावातील जागरूक रहिवासी महेश देशमुख, महेश खोत यांनी या अनुदान प्रकरणात गडबड झाल्याचा संशय व्यक्त करून, कोकण विभागीय आयुक्त, ठाणे जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी श्यामराव देसाई यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर टिटवाळा पोलीस ठाण्यात कोंगरे, शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कागदपत्रे लॉजवर लपविली
तसेच, या मुद्रांक घोटाळ्याची कागदपत्रे कोणाला मिळू नयेत म्हणून ग्रामसेवक शेख याने कल्याणमधील बाजारपेठ विभागातील एक लॉज भाडय़ाने घेतला होता. ही माहिती मिळताच गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी सदर लॉजवर छापा टाकून, घोटाळ्याची कागदपत्रे जप्त केली होती. पोलीस तपासातून या घोटाळ्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता म्हारळमधील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed on marula former sarpanch
First published on: 01-03-2016 at 00:05 IST