ठाणे : गेली अनेक वर्ष लोकमान्य नगर येथील लक्ष्मी पार्क गृहसंकुलातील फेज एक मधील सप्रेम या इमारतीतील रहिवाशांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. पाण्याच्या समस्येमुळे रहिवाशी हैराण झाले होते. अखेर गृहसंस्थेतील सभासद आणि सदस्यांनी एक बैठक घेतली आणि उपाययोजना करण्यासाठी विविध कल्पना सूचविल्या. पावसाच्या पाण्याची आणि वातानूकुलीत (एसी) यंत्रांतून निघणारे पाणी साठवून या रहिवाशांनी गृहसंस्थांना वेगळा आदर्श घालून दिला आहे.

लोकमान्य नगर येथे लक्ष्मी पार्क गृहनिर्माण संस्था आहे. या गृहसंस्थेत फेज एक मध्ये सप्रेम को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी ही सात मजली इमारत आहे. इमारतीमध्ये ६४ सदनिका आहेत. १९९७ मध्ये या इमारतीची नोंदणी झाली आहे. ठाणे महापालिके मार्फत या इमारतीला पाणी पुरवठा होतो. परंतु पाण्याच्या वेळा ठराविक असल्याने रहिवाशी हैराण झाले होते. अनेकदा एक – दोन दिवस पाणी आले नाही, तर नागरिकांचे हाल होत असे. उन्हाळ्यात दररोज दोन टँकर मागविण्याची वेळ रहिवाशांवर येत होती. त्यामुळे पाण्याचे देयकही वाढत होते.

हेही वाचा : डोंबिवलीत घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली अटक

२०१९ मध्ये गृहसंकुलातील सदस्यांनी येथील स्थानिक माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांच्या मदतीने बोअरवेल खणली. येथे ३५० फूट खोलावर पाणी लागले. परंतु हे पाणी किती दिवस टिकणार हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे इमारतीतील संस्थेचे पदाधिकारी अविनाश शालीग्राम, किशोर नायर, सुरेश कदम, अरुण देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत पावसाचे पाणी साठविण्याचा निर्णय घेण्यात आला. इमारतीच्या गच्चीवर शेड बांधण्यात आले होते. पावसाचे पाणी शेडमधून गटारात जात होते. त्यामुळे हे पाणी त्यांनी एका जल वाहिनीच्या मदतीने बोअरिंग टाकीमध्ये टाकले. त्यामुळे दोन वर्षांत पावसाच्या पाण्याची मोठ्याप्रमाणात साठवणूक झाली आहे. हे पाणी आता वापरासाठी २४ तास उपलब्ध होत आहे.

हेही वाचा :“हे वय तुरुंगात जाण्याचे नाही असे शिंदे म्हणाले होते”, संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर सभासदांनी दोन महिन्यांपूर्वी आणखी एक प्रयोग केला. इमारतीतील अनेक रहिवाशांकडे वातानुकूलीत यंत्रणा आहे. वातानुकूलीत यंत्रामधून पाणी बाहेर फेकले जाते. त्यामुळे या यंत्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा वापर व्हावा यासाठी सर्व वातानुकूलीत यंत्रांचे पाणी वाहून नेणारी एक वाहिनी जोडण्यात आली. या पाण्याचा वापर वाहने धुणे, रोपांना पाणी घालणे यासाठी केला जात आहे.

हेही वाचा :शाहू महाराजांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची १०० कोटी रुपयांची बोली

पिण्याचा पाण्याचा सर्वाधिक वापर स्वच्छतागृहात होत होता. महापालिकेकडून येणारे पाणी ठराविक वेळेत येत होते. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण होत होती. आम्ही सर्व सभासद आणि सदस्यांनी पाण्याची साठवणूक कशी करता येईल याकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. आता २४ तास पाणी उपलब्ध होऊ लागले आहे.