डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर व्यवसाय करून नंतर ते सामान एका पोत्यामध्ये भरून रेल्वेच्या डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहात गोदामासारखे ठेवणाऱ्या दोन फेरीवाल्यांच्या विरोधात रेल्वे सुरक्षा बळाने गुन्हा दाखल केला आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात फ आणि ग प्रभागात एकही फेरीवाला बसणार नाही असे नियोजन सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर आणि सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी केले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील दीडशे मीटरच्या आतील फेरीवाल्यांवर दररोज पालिकेकडून कारवाई सुरू आहे. तरीही अनेक फेरीवाले डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रात्री उशिरा पालिका अधिकाऱ्यांची नजर चुकून व्यवसाय करतात.
काही फेरीवाले शहराच्या विविध भागात जाऊन वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत. हे फेरीवाले आपला व्यवसाय बंद केल्यानंतर. सामान एका पोत्यात भरतात. आणि हे सामान डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रेल्वेच्या स्वच्छतागृहात आणून गोदामासारखे ठेवत आहेत. मागील काही महिन्यांपासून फेरीवाल्यांचा हा उपक्रम सुरू आहे.
रेल्वेच्या स्वच्छतागृहात येणाऱ्या प्रवाशांना या गोदामाचा त्रास होत आहे. अनेक प्रवाशांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे फलाटावर मद्यपी भिकारी दिसला तर रेल्वे सुरक्षा बळाचे जवान त्यांच्यावर तातडीने कारवाई करतात. मग त्यांना हे स्वच्छतागृहातील गोदाम दिसत नाही का असे प्रश्न प्रवाशांकडून करण्यात येत होते. रेल्वे स्थानक व्यवस्थापकांची रेल्वेच्या मालमत्तेचा कोणी दुरूपयोग करणार नाही ही जबाबदारी आहे. असे असताना रेल्वे सुरक्षा बळाचे जवान, रेल्वे स्थानक व्यवस्थापक यांची नजर चुकवून रात्रभर फेरीवाले आपले सामान रेल्वेच्या स्वच्छतागृहात गोदामासारखे ठेवत आहेत याविषयी प्रवासी आश्चर्य व्यक्त करत होते.
रेल्वे प्रवासी स्वच्छतागृहात गेले की त्यांना वाटेतच फेरीवाल्यांच्या सामानाचा अडथळा येतो. त्याच्या बाजुला मद्यपी, गर्दुल्ले बसलेले असतात. बाजुला स्वच्छतागृह देखभाल करणारा कर्मचारी आराम करत असतो. त्यामुळे स्वच्छतागृहात महिला प्रवासी गेल्या की त्यांचीही अडचण होते.
एकीकडे पालिका अधिकारी रेल्वे स्थानक भागातून फेरीवाले हटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे रेल्वेचे कर्मचारी फेरीवाल्यांचे सामान रेल्वेच्या स्वच्छतागृहात ठेवण्यास मदत करून फेरीवाल्यांची पाठराखण करत आहेत, अशी टीका प्रवासी करत होते. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे यांनी याविषयी तीव्र नापसंती व्यक्त करून रेल्वेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची गंभीर दखल डोंबिवली रेल्वे सुरक्षा बळाने घेतली. त्यांनी स्वच्छता गृहात ठेवलेल्या सामानाची पाहणी केली. आणि हे सामान कोणाचे आहे याची चौकशी केली. त्यावेळी दोन फेरीवाल्यांची नावे निष्पन्न झाली. रेल्वेच्या मालमत्तेचा दुरुपयोग केल्याबद्दल या दोन्ही फेरीवाल्यांच्या विरुद्ध रेल्वे सुरक्षा बळाच्या अधिकाऱ्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही फेरीवाले डोंबिवली परिसरात वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत.