कल्याण – कल्याण पश्चिमेतील मुरबाड रस्त्यावरील गणेशघाट भागात वर्दळीच्या रस्त्यावर शोभेच्या वस्तू, माती, प्लास्टिकच्या कुंड्या रस्त्याच्याकडेला लावून वाहतुकीस अडथळा होईल अशा पध्दतीने सोमवारी एक विक्रेता वस्तू विक्री करत होता. या वस्तुंमुळे वर्दळीच्या रस्त्याचा काही भाग व्यापला होता. सार्वजनिक वाहतुकीत अडथळा, जीवितास धोका निर्माण होईल अशी कृती केल्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलिसांनी विक्रेत्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मोहम्मद हजरत मोहम्मद अमिन शेख (५२) असे विक्रेत्याचे नाव आहे. ते मुरबाड रस्त्यावरील गणेशघाट भागात राहतात. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने कोणी वस्तू, मंच, मंडप, वाहने उभी केली असतील तर त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश वरिष्ठांनी स्थानिक पोलिसांना दिले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी दुपारच्या वेळेत महात्मा फुले पोलीस ठाण्यातील हवालदार वामन बरमाडे आपल्या पोलीस ठाणे हद्दीत सहकाऱ्यासह दुचाकीवरून गस्त घालत होते. मुरबाड रस्त्यावरील गणेश घाट बस आगारा समोरील वर्दळीच्या रस्त्यावर मोहम्मद शेख रस्त्याला अडथळा होईल अशा पध्दतीने प्लास्टिक, मडकी,मातीच्या कुंड्या, मातीची भांडी विक्री करण्यासाठी बसले होते. या वस्तुंमुळे या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता होती. हवालदार बरमाडे यांनी विक्रेत्याला वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने आपण वस्तू विक्री करत आहात. ही कृती नियमबाह्य आहे. त्यामुळे आपल्यावर कारवाई केली जात आहे असे सांगून त्यांना पंचांसमक्ष त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याण परिमंडळाचा पदभार स्वीकारल्यापासून कल्याण, डोंबिवलीतील रस्त्यावर हातगाड्या लावून रात्री उशिरा व्यवसाय करणारे, रस्त्यावर सिलिंडर लावून खाद्यपदार्थ विक्री करणारे, सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर स्थानिक पोलिसांनी जोरदार मोहीम उघडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.