पुढील वर्षांत महत्त्वाच्या चौकांत सिग्नल यंत्रणा, ८०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण: कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी तसेच शहरातील कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण राहावे, यासाठी या शहरांतील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत या कामांना सुरुवात झाली असून पुढील वर्षभरात सर्व सिग्नल तसेच ८०० सीसीटीव्ही कार्यान्वित होतील, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

कल्याण-डोंबिवली शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढली असून शहराच्या सीमाही विस्तारल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांचा भारही वाढला आहे. असे असले तरी गेली कित्येक वर्षे शहरामधील महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा नसल्याने अनेक ठिकाणी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी प्रशासनाने गेल्या वर्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरात सिग्नल यंत्रणा उभारण्याच्या प्रकल्पाची आखणी केली होती. त्यासोबतच या सिग्नल खांबांवर आणि शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी ८०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाचाही समावेश होता. हे काम नोव्हेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, मार्चमध्ये करोनाचे संकट ओढवल्याने काही दिवसांसाठी हे काम रखडले होते. अखेर टाळेबंदीतून काहीशी शिथिलता मिळाल्याने हे काम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आले आहे. कल्याण, डोंबिवली पूर्व, पश्चिम, टिटवाळा, शहाड या ठिकाणांचे महापालिका प्रशासनाने आणि पोलिसांनी मिळून सर्वेक्षण केले असून या परिसरातील महत्त्वाच्या वाहतूक चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा आणि इतर ३२० ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी खांबांची उभारणी सुरू करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ही कामे वेगाने पूर्ण केली जाणार असून नव्या वर्षांत या दोन्ही सेवा पूर्णपणे कार्यान्वित होतील, अशी माहिती कल्याण-डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाचे माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रशांत भगत यांनी दिली.

सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. करोना महामारीमुळे तीन महिने प्रभावीपणे काम करता आले नाही. पण टाळेबंदीत शिथिलता मिळाल्यापासून ही कामे सुरू केली असून लवकरच ती पूर्ण करण्यात येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुण जुनेजा, कार्यकारी अभियंता, स्मार्ट सिटी प्रकल्प