वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात अडथळे; सीसीटीव्हींची देखभाल दुरुस्ती करण्यात पालिकेची टाळाटाळ
ऋषीकेश मुळे, ठाणे</strong>
ठाणे शहरातील मुख्य चौकांत वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे तसेच बेशिस्त वाहनचालकांवर जरब ठेवण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांच्या सहकार्यातून उभारण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. या कॅमेऱ्यांमुळे नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाई करता येत होतीच; पण त्याबरोबरच वाहतुकीचे तातडीने नियमन करणेही शक्य होत होते. परंतु तीन हात नाका, कॅडबरी जंक्शन आणि नितीन कंपनी या तिन्ही चौकांतील कॅमेऱ्यांमध्ये देखभालीअभावी बिघाड झाले आहेत. याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यवाहीत अडथळे येत आहेत.
तीन हात नाका, नितीन आणि कॅडबरी या तीन जंक्शन परिसरातील रस्ते जुन्या आणि नव्या ठाणे शहराच्या दिशेने जाणाऱ्या उपरस्त्यांना भेदून जातात. त्यामुळे या प्रमुख तीन जंक्शन परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. या जंक्शनमधून पूर्व द्रुतगती मार्ग जात असल्याने स्थानिक वाहनांसह जड-अवजड वाहनांची या परिसरात वर्दळ असते. वाहनांच्या अधिक वर्दळीमुळे या भागात अनेक अपघात होत असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येते. अंतर्गत मार्गावर अपघात करून शहराच्या बाहेर पळून जाणाऱ्या वाहनाला या तीन जंक्शनमधून पुढे जावे लागते. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या जंक्शनलगत २०१५ रोजी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. हे सर्व सीसटीव्ही कॅमेरे गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. शहरातील विविध मार्गावर अपघाताची नोंद झाल्यानंतर अपघात करणारा वाहनचालक जंक्शन परिसरातील रस्त्यावरून पळून गेल्यावर केवळ सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्यामुळे वाहनचालकाची ओळख पटवणे कठीण जात असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे देखभाल दुरुस्तीच्या कारणामुळे बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी ठाणे महापालिकेचे विद्युत विभाग उपनगर अभियंता सुनील पोटे यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
‘आरटोओ’कडून कडक तपासणी
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध भागांत होणाऱ्या वाहन अपघातांविषयी लोकसत्तामधून वृत्त प्रसिद्ध करण्यात येत असून याची दखल घेत परिवहन विभागाच्या उच्चायुक्तांनी अपघात टाळण्यासाठी राज्यात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) वाहनचालकांची होणारी चाचणी, त्यांना दिला जाणारा परवाना आणि व्यावसायिक वाहनांची केली जाणारी तपासणी या सर्वाचा वेग वाढविण्यात आला आहे.
महापालिकेने गांभीर्याने दखल घेऊन तीन हात नाका, नितीन आणि कॅडबरी जंक्शन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल दुरुस्ती करून कॅमेरे लवकर सुरू करायला हवेत. बंद सीसीटीव्हींमुळे अपघात करून पळून जाणाऱ्या वाहनचालकाची ओळख पटत नाही.
– अनिल मांगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-वागळे विभाग
सीसीटीव्ही योजना कागदावरच
स्मार्ट शहराचा डंका पिटवणारी ठाणे महापालिका शहरातील सीसीटीव्हींच्या बाबतीत मात्र स्मार्ट नसल्याचे पाहायला मिळत आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सामाजिक व्यवस्था सुरळित राहावी अशी उक्ती फक्त सीसीटीव्ही प्रकल्पापुरतीच मर्यादित राहिल्याचे पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील अंतर्गत मार्गावर देखील सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता. त्या दिशेने जमिनीखालून वाहिन्या टाकण्याचे प्रयत्नही झाले. मात्र सीसीटीव्हीला या वाहिन्याच जोडल्या नसल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.