ठाणे : गेल्या काही महिन्यांपासून सक्रीय झालेल्या ठाणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून ठाणे महापालिकेविरोधात विविध आंदोलने करण्यात येत असून अशाचप्रकारे सोमवारी ठाणे काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा एकदा लाक्षणिक उपोषण केले. ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाचा कारभार अनागोंदी असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नेत्यांनी हे उपोषण केले. या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी नेत्यांनी यावेळी केली.
शहरी भागात विकास योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करत सुनियोजित विकास करण्याची जबाबदारी शहर विकास विभागाची असते. असे असताना ठाणे महापालिकेच्या या विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून त्याच्या चौकशीच्या मागणीसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता काँग्रेसच्या नेत्यांनी महापालिका मुख्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी शहर विकास विभागावर गंभीर आरोप केले. या एकदिवसीय उपोषणात ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह भालचंद्र महाडिक, राजेश जाधव, जे बी यादव तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदविला.
ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. विकासक शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करत ठाण्याची कशी लूट करत आहेत याची पोलखोल काँग्रेसने केली आहे. यावेळी त्यांनी शहर विकास विभागाचे सहाय्यक संचालक नगर रचना संग्राम कानडे यांची भेट घेत महापालिका बिल्डरांवर मेहरबानी करत सर्व नियमांना बगल देत ठाणेकरांची करत असलेली फसवणूक याची चौकशी करण्याची मागणी केली. येऊर वनपरिक्षेत्रात दिलेल्या बांधकाम परवानग्या, आरक्षण बदल, टीडीआर घोटाळा,शैक्षणिक भूखंड वाटप घोटाळा, वर्षानुवर्षे एकाच विभागात कार्यरत असणारे अधिकारी, शहर विकास विभागाने बदललेली आरक्षणे, कायद्याचा गैरवापर, रेंटल हाउसिंग, पी पी पी तत्वावर नियमबाह्य दिलेल्या परवानग्या, कोर्टात चालू असलेल्या केसेस, अधिकाऱ्यांनी विकासकांना झुकते माप देत त्याच प्रकल्पामध्ये केलेली गुंतवणूक,चुकीचे देत असलेले डी पी रिमार्क, एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली (डीसीपीआर)चा होत असलेला भंग या सगळ्या गोष्टी समोर आणत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे.