प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत बाब उजेडात; कंपनीचा वीज, पाणीपुरवठा खंडित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणक्षेत्रात टाकण्यात आलेल्या रासायनिक कचऱ्याप्रकरणी संशय असलेल्या डिजीकेम कंपनीचेच हे पाप असल्याचे आता स्पष्ट झाले असून प्राथमिक तपासणीत याच कंपनीने हा कचरा टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने या कंपनीचे वीज आणि पाणी तोडण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.

अंबरनाथ येथील चिखलोली धरणक्षेत्रात शेजारीच असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी रासायनिक कचरा टाकल्याने दोन आठवडय़ापूर्वी एकच खळबळ उडाली होती.

धरणक्षेत्रात टाकलेल्या या रासायनिक कचऱ्यामुळे चिखलोलीचे पाणी अशुद्ध होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. मात्र पावसांने उसंत दिल्याने हा कचरा पाण्यात जाण्यापासून वाचला. अन्यथा अंबरनाथच्या नागरिकांच्या पाण्यात रसायने मिसळल्याने मोठी हानी झाली असती. हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळानेही घटनास्थळी धाव घेतली होती. तब्बल ४८ टन कचरा यावेळी उचलण्यात आला होता. हा कचरा टाकल्याप्रकरणी एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एन. ७१ मधील डिजीकेम कंपनीचे नाव आता समोर आले आहे. याच कंपनीने आपल्या कंपनीतील उरलेली रसायने तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे न पाठवता पैसे वाचवण्याच्या उद्देशाने चिखलोलीच्या मागच्या बाजूस टाकली होती.

याबाबत चौकशीसाठी कंपनीत गेले असता त्यांनी हा कचरा टाकल्याची कबुली दिली. त्यामुळे प्रथमदर्शी आढळलेल्या तपासणीनुसार हा कचरा डिजीकेम केमिकल कंपनीचाच असल्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कल्याण विभागीय मंडळाचे अधिकारी धनंजय पाटील यांनी सांगितले आहे. या कृत्याप्रकरणी डिजीकेम कंपनीचा वीज आणि पाणी पुरवठा तोडण्याचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि संबंधित विभागांना देण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली आहे.

ज्या दिवशी या रासायनिक कचऱ्याच्या पाहणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी चिखलोली धरणक्षेत्रात आले होते. त्याचवेळी याच कंपनीचे काही कर्मचारी कचरा उचलण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले होते. तेव्हापासूनच हा कचरा ‘डिजिकेम’चा असल्याचा संशय बळावला होता.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chemical waste maharashtra pollution control board marathi articles
First published on: 28-06-2017 at 00:47 IST