जामीन अर्ज फेटाळल्याने अटक होण्याची शक्यता
बदलापूर शहरातील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
बदलापूर नगरपालिकेतील विकास हस्तांतरण हक्क अर्थात टीडीआर घोटाळ्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षी दोन माजी नगराध्यक्षांसह तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी आणि पालिकेच्या चार अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी चौकशी समितीने अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला होता. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेही याप्रकरणी नव्या कलमांची नोंद या गुन्ह्य़ात केली होती. यात सार्वजनिक विभागाने सादर केलेल्या अहवालात विकासकांना दिलेल्या टीडीआरच्या प्रमाणपत्रानुसार त्याचे मूल्य १११ कोटींचे असल्याचे तपास अधिकाऱ्यांच्या अहवालातून कळवले होते. अटकेपासून वाचण्यासाठी सर्व आरोपींनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन मिळवला होता.
मंगळवारी झालेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीत सरकारी वकील संदीप शिंदे यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी बदलापूर नगरपालिकेच्या चार अभियंत्यांचा जामीन मंजूर केला. मात्र या घोटाळ्यातील आरोपी पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे खात्रीलायक
सूत्रांकडून समजते. मात्र या निकालाची प्रत बुधवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून भालचंद्र गोसावी यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
टीडीआर घोटाळ्यात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना धक्का
जामीन अर्ज फेटाळल्याने अटक होण्याची शक्यता बदलापूर शहरातील बहुचर्चित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत तत्कालीन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे शहरातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. बदलापूर नगरपालिकेतील विकास हस्तांतरण हक्क अर्थात टीडीआर घोटाळ्याप्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने […]
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 04-05-2016 at 01:01 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief officer bhalachandra goasvi bail application dismissed by bombay high court