ठाणे – शहरातील उपवन तलावात एक १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणाची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राज भास्कर चाबूकस्वार (१०) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तो वर्तक नगर भागातील भीमनगर परिसरात राहत होता. राज हा त्याच्या दोन मित्रांसोबत उपवन तलावाच्या काठावर फिरण्यासाठी गेला होता. तेव्हा राज पोहण्यासाठी तलावात उतरला. पोहताना त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच, वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी,आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने राजला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर, वर्तकनगर पोलीस अधिकारी यांच्यामार्फत पुढील कार्यवाहीकरिता रुग्णवाहिकेमधून ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.