कल्याण- कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील एका उच्चभ्रू सोसायटी मधील धनवान कुटुंबातील दोन मुले मौजमजेसाठी लागणाऱ्या पैशासाठी सायकल चोरी करत होती. या चोरी आणि सायकल विक्रीसाठी या सोसायटीचा रखवालदार या दोन १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलांना साहाय्य करत होता. खडकपाडा पोलिसांनी रखवालदार सॅड्रिक एबिनिझर याला अटक केली आहे.
रखवालदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चोरीच्या १४ सायकल जप्त केल्या आहेत. अलीकडे बहुतांशी रहिवासी सकाळच्या फिरण्यासाठी, शहरा अंतर्गत प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. बहुतांशी शाळकरी मुले शाळेत, महाविद्यालयात जाण्यासाठी सायकल वापरतात. या सायकल महागड्या असतात. काही जण शर्यतीचा सराव करण्यासाठी बाहेरील देशातून सायकली मागवून घेतात. अशा महागड्या सायकली चोरण्याचे प्रमाण खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत वाढले होते. या चोरीच्या घटना खडकपाडा पोलीस ठाण्यासह इतर पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या.
एका गृहसंकुलात सायकल चोरीचा प्रकार तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. दोन मुले सायकल चोरी करत असलयाचे त्यात दिसत होते. वाढत्या सायकल चोरीच्या प्रकाराने पोलीस हैराण होते. उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या साहाय्याने आरोपी मुलांचा शोध घेण्याचे आदेश खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिले. पोलीस निरीक्षक शरद झिने, नितीन आंधळे, अनिल गायकवाड यांचे विशेष तपास पथक तयार करण्यात आले. शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांनी सायकलवरून येणाऱ्या मुलांवर, नागरिकांवर पाळत ठेवली.
बिर्ला महाविद्यालय परिसरातील संदीप हाॅटेल जवळ गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक अल्पवयीन मुलगा सायकल वरून जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्याला थांबवून जवळील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा चित्रीकरणातील मुलगा हा सायकल चोरीतील असल्याचे स्पष्ट दिसत होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने त्याचा अल्पवयीन साथीदार आणि रखवालदाराच्या साहाय्याने या चोऱ्या आणि सायकलची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले, मौजमजेसाठी उच्चभ्रू संकुलातील दोन मुले सायकल चोरी करत होती. या सायकली ते रखवालदाराच्या माध्यमातून विकत होते. रखवालदारला अटक केली आहे. त्याच्याकडून १४ सायकल जप्त केल्या आहेत. या तिघांनी आणखी किती ठिकाणी सायकल चोरी केल्या आहेत याची माहिती घेतली जात आहे. मुले अल्पवयीन असल्याने त्या कायद्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल.