नाताळोत्सव उत्साहात!

आनंदाची पर्वणी असलेला नाताळ सण वसईत उत्साहात आणि शांततेत साजरा झाला.

नाताळनिमित्त वसईतील माणिकपूर येथील संत मायकल चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

धार्मिक प्रवचने, सामूहिक प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

आनंदाची पर्वणी असलेला नाताळ सण वसईत उत्साहात आणि शांततेत साजरा झाला. दिवसभर धार्मिक प्रवचने, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होतीे. अनेक चर्चेसना रोषणाई करण्यात आली होती आणि तिथे सामूहिक प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले होते. वसईकरांनी एकमेकांच्या घरी भेटी देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

नाताळ सणाच्या आगमनाआधी महिनाभरपासून विविध विधींद्वारे नाताळ उत्सवाची सुरुवात होते. २४ डिसेंबरच्या रात्री १० वाजता वसईतल्या सर्व ३४ चर्चेसमध्ये एकाच वेळी मिस्सा घेण्यात आलीे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मध्यरात्री बाराऐवजी दहा वाजता ही मिस्सा घेण्यात येते. या मिस्सेसाठी सर्व ख्रिस्ती बांधव सहकुटुंब उपस्थित होते. रात्री चर्चकडे जाणाऱ्या लोकांचे रंगीबेरंगी पोशाख सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. चर्चमध्ये मिस्सेसाठी गर्दी झालेली असली तरी कुठेही गोंधळ जाणवत नव्हता. प्रत्येक चर्चचे प्रमुख धर्मगुरू या मिस्सेच्या वेळी हजर होते. या वेळी प्रदूषण होईल, असे सर्व प्रकार टाळण्यात आले.

नाताळ गोठय़ांमधूनही ‘पर्यावरण रक्षण’ ही संकल्पना देण्यात आली आहे. दिवसभर लोकांनी एकमेकांच्या घरी भेटी देऊन नाताळच्या शुभेच्छा दिल्या. गृहिणींनी केकबरोबर खास वसईचे पारंपरिक पदार्थ त्यासाठी तयार केले होते. एकमेकांच्या घरी भेटी देणे, धार्मिक प्रवचने आणि कार्यक्रमात भाग घेऊन लोकांनी नाताळ साजरा केला. वसईतल्या सर्व चर्चेसवर रोषणाई करण्यात आली आहे, तर प्रत्येकाने आपल्या घरासमोर आकर्षक कंदील आणि ख्रिसमस ट्री उभा केला आहे.

अनेक ख्रिस्ती तरुणांच्या गटाने जुने कपडे गोळा करून गरीब लोकांना देण्याचा उपक्रम राबविला होता. त्याचे आज वाटप करण्यात आले. प्रभू येशूने लोकांच्या कल्याणासाठी आणि आनंदासाठी मानवाचा जन्म घेतला आहे. त्यामुळे सर्वानी एकमेकांवर प्रेम करून आनंद पसरवा, असा संदेश चर्चमधून यानिमित्ताने देण्यात आला. संध्याकाळी अनेक ठिकाणी ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते.

विश्वबंधुत्वाचा प्रसार करा!

नाताळनिमित्ताने वसई बिशप यांचा संदेश

‘‘बंधुता हे एक दुर्मीळ होत चाललेले मानवी मूल्य आहे. बंधुत्वाच्या भावनेशिवाय शांती मिळणार नाही. आपण निरनिराळ्या जातीधर्मात विभागले गेलेलो भाऊ-बहीण आहोत. त्याला धरून आपले आचरण असायला हवे. सर्व धर्मात असलेली बंधुत्वाच्या तत्त्वाचा प्रसार होणे आवश्यक आहे,’’ असे वसई धर्मप्रांताचे धर्मगुरू डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी सांगितले. नाताळनिमित्त वसईच्या बिशप्स हाऊसमध्ये आयोजित सर्वधर्मीय नाताळ कार्यक्रमात त्यांनी शांतीे आणि बंधुत्वाचा संदेश दिला.

नाताळचा संदेश देताना बिशप म्हणाले की, मूलतत्त्ववादाची लागण सर्वाना होते आहे. दुर्दैवाने ख्रिस्ती बांधवांनाही या मूलतत्त्ववादाची लागण झाली आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद हा धर्म नसून ती अंधश्रद्धा आहे. यामुळे संपूर्ण धर्म आपण बाद करू शकत नाही, असे ते म्हणाले. बिशप यांनी आपल्या भाषणात पर्यावरण बचाओचा संदेश दिला. पर्यावरणाची परिस्थिती बिकट बनत चाललीे असल्याचे ते म्हणाले. पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजे सामुदायिक आत्महत्या आहे, असे त्यांनी सांगितले. ८० टक्के संपत्ती ही १७ टक्के चर्चच्या हातात आहे. गरिबांचे रडणे ऐकणार कोण, पैसाच परमेश्वर बनत चालला आहे, असा उद्विग्नताही त्यांनी व्यक्त केली. या मेळाव्यात सर्व धर्माचे प्रतिनिधी, खासदार चिंतामण वनगा, आमदार क्षितिज ठाकूर, सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.

वृद्धाश्रमात धर्मगुरूंचा नाताळ

केवळ प्रवचनातून नाही, तर कृतीतून संदेश

नाताळ हा आनंदाचा सण आहे. पण या आनंदाचा संदेश केवळ आपल्या प्रवचनातून न देता सेंट पीटर चर्चच्या धर्मगुरूंनी वृद्धाश्रमातीेल महिलांसोबत साजरा केला. प्रथमच अशा प्रकारे या वृद्धाश्रमात नाताळ साजरा केला.

वसईत नाताळनिमित्त अनेक ठिकाणीे धार्मिक प्रवचने आयोजित करण्यात आली होती. प्रभू येशू आनंद देण्यासाठी आला आहे, असा संदेश दिला जात होता. परंतु हा आनंद केवळ प्रवचनातून आपण का देतो, प्रत्यक्ष का नाही असा विचार कोळीवाडा येथील सेंट पीटर चर्चच्या धर्मगुरूंनी केला. त्यांनी शुक्रवारी सकाळी चर्चच्या कुटुंबीय समिती आणि युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावातील वृद्धाश्रम गाठले. या वृद्धाश्रमात ५० हून अधिक अनाथ आणि वृद्ध महिला आहेत. धर्मगुरूंनी नाताळचा खास केक या वृद्ध महिलासोबत कापला. त्यानंतर सर्वाना फराळाचे वाटप करून करमणुकीचे कार्यक्रम केले. ‘हे जगच एक कुटुंब आहे. कुटुंबासमवेत आपण नाताळचा आनंद साजरा करतो. मग या वृद्ध निराधार महिला या आनंदापासून का वंचित राहात होत्या? हा कुठल्या एका धर्माचा सण नाही. त्यामुळे यंदा पारंपरिक प्रवचनांच्या कार्यक्रमांना फाटा देत आम्ही या महिलांसोबत नाताळ साजरा करण्याचा निर्णय घेतला,’ असे फादर अ‍ॅल्बर्ट डिसिल्वा यांनी सांगितले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Christmas festival in victimized in vasai virar

ताज्या बातम्या