डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावरील ब्राह्मण सभेसमोरील काही गृहसंकुलांना मागील काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी असलेल्या मध्यमवर्गियांची वस्ती असलेल्या या गृहसंकुलांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांनी पालिकेत तक्रारी केल्या आहेत.
ब्राह्मण सभा परिसराला कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाथर्ली येथील रामचंद्र जलकुंभ येथून पाणी पुरवठा केला जातो. जलकुंभ उंच टेकडीवर आणि ब्राह्मण सभा परिसर, पेंडसेसनगर, सारस्वत काॅलनी, नेहरू रस्ता, फडके रस्ता हा परिसर या टाकीच्या तळाला असल्याने या भागाला नेहमी पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होतो. मागील दोन महिन्यांंपासून ब्राह्मण सभेसमोरील काही गृहसंकुलांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांनी आपल्या सोसायटीला होत असलेल्या जलवाहिन्या खासगी तंत्रज्ञ आणून तपासून घेतल्या. त्यात कोठेही काही बिघाड नसल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले.
पालिकेकडून पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर नागरिकांनी पालिकेच्या फ प्रभागात यासंदर्भात तक्रार केली आहे. पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन पाहणी केली. गेल्या महिन्यापासून या भागात एक ते दोन खड्डे पाणी पुरवठा विभागाकडून मारण्यात आले आहेत. पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होईल यासाठी पालिका अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
फडके रस्ता, नेहरू रस्ता आणि सर्वेश सभागृहात पुरेशा दाबाने पाणी येत आहे. मग आपल्याच परिसराला का कमी दाबाने पाणी येतो. याचा तपास स्थानिक नागरिकांनी केला. त्यावेळी त्यांना सावरकर रस्ता भागातील काही सोसायटी चालकांनी आपल्या सोसायटीला अधिक दाबाने पालिकेचे पाणी खेचण्यासाठी बुस्टर बसविले आहेत. हे बुस्टर इतर भागात जाणारे पाणी उच्च क्षमतेने खेचत असल्याने पुढील सोसायट्यांना जाणारे पाणी कमी दाबाने जाते, असे सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. पालिकेच्या जलवाहिनीला अधिक पाणी खेचण्यासाठी बुस्टर बसविणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांंनी कोणत्या सोसायट्यांनी बुस्टर बसविले आहेत. त्याचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
टिळक रस्त्यावरील काही भागातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दोन दिवसात हा विषय मार्गी लागेल. राजेंद्र पाखले अभियंता, पाणी पुरवठा विभाग.