महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचे ओझे
निखिल अहिरे
ठाणे : जिल्ह्यातील विविध प्रशासकीय कार्यालयातील महसूल विभागामध्ये करोना काळापासून एकूण मंजूर पदांपैकी ८१ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. या रिक्त पदांमध्ये तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहन चालक आणि शिपाई या पदांचा समावेश आहे. मागील दीड ते दोन वर्षांपासून ही भरती रखडल्याने तेथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे कामे होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
जमिनी वाटप, बांधकाम, नागरिकांच्या जमिनी संदर्भातील कागदोपत्री काम, जमिनी संदर्भातील कर वसुलीची कामे, शासकीय तसेच खासगी जागांची नोंदणी ठेवणे, जमिनी संदर्भातील विविध दाखल्यांचे वाटप करणे आणि दाखले वाटप अशी कामे महसूल विभागामार्फत करण्यात येतात. या विभागाअंतर्गत नेमणूक करण्यात येणाऱ्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांची जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांमध्ये आणि तालुक्यांच्या ठिकाणी नेमणूक करण्यात येते. यामध्ये शिधा पुरवठा विभाग, निवडणूक विभाग, करमणूक कर विभाग यांसारख्या इतरही विभागांचा समावेश असतो. तसेच ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध उपायोजना पोहचाव्यात यासाठी तहसीलदारांची नियुक्ती करण्यात येते. एकंदरीतच महसूल विभागाची कामे ही थेट सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असतात. मागील काही महिन्यांपासून या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तेथील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याचे चित्र आहे.
रिक्त पदे कोणती?
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभाग, निवडणूक कर आणि संजय गांधी योजना विभाग या तीन विभागांमध्ये तहसीलदारांची अद्याप नियुक्ती झाली नाही. तसेच सहाय्यक करमणूक कर अधिकारी तर शहापूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षण अधिकारी अशी नायब तहसीलदारांची दोन पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर ठाणे, मिरा भाईंदर, बेलापूर, कल्याण पूर्व, डोंबिवली, मुरबाड, भिवंडी पूर्व आणि पश्चिम आणि उल्हासनगर या सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक नायब तहसीलदारांची ९ पदे रिक्त आहे. ठाणे उपविभागात ३, भिवंडी उपविभागात २, कल्याण उपविभागात ५, उल्हासनगर उपविभागात ३, अशी १३ तलाठींची पदे रिक्त आहेत.