कल्याण – कल्याण, डोंंबिवलीत बंद घरांचे दरवाजे फोडून, खिडक्यांच्या जाळ्या तोडून घरात प्रवेश करून दिवसा, रात्री चोऱ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या वाढत्या चोऱ्यांमुळे नोकरदार वर्ग सर्वाधिक अस्वस्थ आहे. कामानिमित्त घराबाहेर पडल्यावर पाळत ठेऊन असलेले चोरटे घरात चोऱ्या करत आहेत. गेल्या दोन दिवसांत कल्याणमध्ये तीन घरांमध्ये चोऱ्या झाल्या आहेत.
कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयाजवळील कोकण वसाहतीमध्ये राहणाऱ्या आकाश नागावकर सोमवारी सकाळी घरात झोपले होते. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. या दरवाजावाटे घरात प्रवेश करून सभागृहातील पिशवीतील मोबाईल, रोख रक्कम असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही चोरी सिध्दी भिलारे हिने केली असल्याचा संशय आकाश यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.
हेही वाचा – ठाणे : यंदा अपघातांच्या संख्येत वाढ; घोडबंदर, नारपोली, मानपाडा रोड अपघातांची केंद्रे
डोंबिवलीतील भोपर भागातील चंद्रेश ओएसिस सोसायटीत राहणारे हाॅटेल व्यावसायिक ज्ञानेश्वर डोंगरे (३५) सोमवारी सकाळी आपल्या पत्नीसह बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. घराचा दरवाजा बंद होता. पाळत ठेऊन असलेल्या चोरट्याने डोंगरे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरातील कपाटातील तिजोरीत ठेवलेले सोने, चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. घरी आल्यानंतर डोंगरे यांना दरवाजाचे टाळे तोडले असल्याचे दिसले. घरात गेल्यावर त्यांना चोरी झाल्याचे समजले. मानपाडा पोलीस ठाण्यात डोंगरे यांनी तक्रार केली आहे.
कल्याणमधील भोईवाडा भागातील शकील कुवारी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याची अंगठी असा एकूण ४४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.