भारतीय संगीताची खासियत म्हणजे २२ श्रुती आणि गुरू-शिष्य परंपरा. वादन असो अथवा गायन! संगीतातील ७ शुद्ध स्वर आणि ५ कोमल स्वर यांची स्वरस्थानके पक्की करून घेण्याची मोठी जबाबदारी गुरूवर असते. शिष्यासाठी या १२ स्वरांची स्थानके नेमकी लक्षात ठेवणे आणि त्याबरहुकूम आपल्या वाद्यातून किवा गळ्यातून तो काढणे ही अवघड परीक्षा असते, कारण यामध्ये गुरू समोर नसले, की आपण निर्माण केलेला सूर बरोबर की चूक हे ठरवायचे कसे? स्वर लिहून ठेवायचा कसा आणि त्याचे नेमके स्थान tv15आठवायचे कसे? हार्मोनियमवर हे स्वर ऐकावे, तर भारतीय संगीत २२ श्रुतींचे आणि हार्मोनियम १२ स्वरांच्या युरोपियन इक्वीटेम्पर्ड पद्धतीचे! मग नक्की संगीत साधना करायची कशी? असे नाना प्रश्न त्या बिचाऱ्या शिष्याच्या मनात गोंधळ निर्माण करत असतात. एखाद्या स्वराचे किवा स्वरसमूहाचे डॉक्युमेंटेशन करणे आणि तो परत मूळ स्वरूपात वाजविणे अथवा गाणे ही कला युरोपियन संगीत अभ्यासकांनी आत्मसात केली; पण दुर्दैवाने भारतीय संगीत अभ्यासकांमध्ये घराणे आणि त्याच्या साचेबंद पद्धती याच्या जबरदस्त पगडय़ामुळे हा विचार आजपर्यंत दूरच राहिला.
संगीत अभ्यासकांच्या या समस्येचा मूलभूत विचार करून २२ श्रुतींचे नेमकी गणिती स्थान मांडणे आणि ते तारेवर विशिष्ट अंतरांवर प्रत्यक्ष वाजवून ऐकण्याची सोय उपलब्ध करणे यावर डॉ. विद्याधर ओक यांनी मौलिक संशोधन  प्रसिद्ध केले आहे. संगीत, पदार्थविज्ञान शास्त्र (फिजिक्स) आणि गणित या त्रिसूत्रीच्या साहाय्याने त्यांनी उलगडून दाखवलेली २२ श्रुतींची अतिशय विलोभनीय षड्जगंधार आणि षड्जपंचम श्रुती मंडलं आणि त्यामधून होणारी अनेक रागांची निर्मिती, ही भारतीय संगीतातील एक क्रांतीच ठरली आहे. या संशोधनाला पं. बबनराव हळदणकर, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पं. विश्वमोहन भट्ट, डॉ. एन. राजम, पं. अजय चक्रवर्ती अशा अनेक दिग्गजांनी सहमती दर्शवीत डॉ. विद्याधर ओक यांची पत्ररूपाने प्रशंसा केली आहे.
डॉ. ओक हे संशोधनात सांगतात की, ‘‘राग सादरीकरणात आलाप, मींड, अलंकार करताना रागाचे स्वर असंख्य नादांनी जोडले जातात यालाच श्रुती म्हणायचे, असा खूप मोठा गरसमज आजही अनेक शिक्षक, गुरू आणि पर्यायाने विद्यार्थी यांच्या मनात पक्का झाला आहे; परंतु आपल्या रागसंगीतात एका सप्तकात विशिष्ट २२ स्थानांवरच ही स्वर संवेदनं निसर्गाने अचूक बसविली आहेत.’’ षड्जगंधार-पंचमाच्या १००-१२५-१५० या नसíगक प्रमाणानुसार सप्तस्वर तयार होतात आणि यापुढे गणिती प्रमाणात श्रुती स्पष्ट पुढे दिसतात. यासाठीचे पूर्णत: वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊन भारतीय २२ श्रुतींची अचूक स्थाने डॉ. ओक यांनी आपल्या संशोधनात प्रसिद्ध केली. फक्त तेथेच न थांबता, या श्रुती प्रत्यक्ष ऐकता याव्यात यासाठी २२ श्रुती हार्मोनियम, मेटॅलोफोन, श्रुती वीणा, स्वरदर्शक अशी उपकरणं त्यांनी अथक परिश्रमाने तयार केली. याच क्रमवालीतील पुढील अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स ‘२२ श्रुती टय़ूटर’ नवीन पिढीसाठी डॉ. ओक यांनी तयार केला आहे. यामध्ये कुठलीही फ्रीक्वेन्सी आपण ‘सा’ म्हणजे षड्ज म्हणून निवडल्यावर त्यानंतरच्या २२ श्रुती tv12आपण ऐकू शकतो आणि त्या श्रुतीचे नेमके स्वरस्थान डिजिटल डिस्प्लेवर पाहू शकतो. या उपकरणात ५०० भारतीय संगीतातील रागांची श्रुती स्थानके ऐकण्याची सोय आहे. या आधुनिक उपकरणाचे उद्घाटन २२ मार्च रोजी ठाण्यातील सहयोग मंदिर येथे सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रीमती आशाताई खाडिलकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ शारदा सुगम संगीत विद्यालय आणि २२ श्रुती संस्था यांच्यातर्फे होत आहे.
२२ श्रुतींचे ज्ञान संगीत अभ्यासकांपर्यंत पोहोचावे यासाठी डॉ. ओक यांनी ‘श्रुती निपुण’ या अभ्यासक्रमांची आखणी केली. २२ श्रुतींचे ज्ञान देणारा जगातील हा पहिला कोर्स आहे. आजपर्यंत यामध्ये ४८ विद्यार्थी सहभागी झाले, यातील सहा विद्यार्थ्यांनी प्रोत्साहित होऊन डॉ. ओक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची श्रुतिवीणा बनविली आहे. या विद्यार्थ्यांना प्रमाण श्रुती, न्यून श्रुती, पूर्ण श्रुती या संकल्पनेचे आकलन झाल्यावर आणि २२ श्रुती ऐकल्यावर झालेला आनंद नक्कीच ‘अजि म्या ब्रह्म पाहिले’ असा असणार! या विद्यार्थ्यांनी २२ श्रुती अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल ‘श्रुती निपुण’ ही पदवी २२ मार्च रोजी त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
कोणतेही संशोधन ही संशोधकाच्या प्रबळ इच्छाशक्तीची परीक्षाच असते. डॉ. ओक यांचे संशोधन भारतीय संगीत जगतावर वेगळा प्रकाश टाकणारे आणि तरंग उठवणारे आहे यात शंका नाही. संशोधनाच्या या विविध टप्प्यांतील अडचणी, भारतीय संगीत अभ्यासकांच्या त्यावरील संमिश्र प्रतिक्रिया, मतभिन्नता, श्रुती उपकरणे करताना आलेल्या तांत्रिक समस्या या संशोधनाचा रंजक प्रवास, ज्येष्ठ संगीततज्ज्ञ पं. सदाशिव बाक्रे यांनी ‘श्रुती विज्ञान आणि राग सौंदर्य’ या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. यामध्ये २२ श्रुतींचे आकलन झाल्यावर जाणवणारे रागसौंदर्य पं. बाक्रे यांनी उलगडून दाखविले आहे. या पुस्तकाचे २२ मार्चच्या समारंभात प्रकाशन होणार आहे. या वेळी २२ श्रुतींचे प्रात्यक्षिक आपल्या गायन-वादनातून सादर करणार आहेत डॉ. वरदा गोडबोले (गायन), डॉ. संगीता शंकर (व्हायोलिन) आणि डॉ. सुनीलकांत गुप्ता (बासरी).
अनेक पिढय़ांची समृद्ध परंपरा लाभलेल्या भारतीय संगीताला २२ श्रुतींची माहिती असली तरी हे ज्ञान काळाच्या कसोटीवर  कायमस्वरूपी राहणे आवश्यक आहे. वैश्विक पातळीला अनुरूप आणि आवश्यक स्वरूपात ते सर्व संगीत अभ्यासकांना उपलब्ध व्हायला हवे, या मनस्वी तळमळीने आणि प्रबळ इच्छाशक्तीने डॉ. विद्याधर ओक यांनी हे अभ्यासपूर्ण संशोधन जगापुढे मांडले आहे. याची सखोल माहिती 22shruti.com या संकेतस्थळावर त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय संगीत जगतातील ही खरोखरीच ‘बीट ऑफ’ घटना आहे. म्हणूनच डॉ. ओक यांना पाठविलेल्या एका कौतुकपूर्ण पत्रात पं. बबनराव हळदणकर लिहितात, ‘एक दिवस भारतीय संगीताच्या इतिहासात आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल.’