रागदारी संगीताची मैफल ही श्रोत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. त्यातून केवळ मनोरंजनच नव्हे तर त्यापलीकडचे समाधान मिळते. गायक-वादकांप्रमाणेच श्रोत्यांचीही ब्रह्मानंदी टाळी लागते आणि ‘अवघा रंग एक झाला’चे भाव निर्माण होतात. गेल्या शनिवारी संध्याकाळी ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात श्रोत्यांनी अशाच एका सायंकालीन रागदारीवर आधारित मैफलीचा आनंद लुटला.
संगीत कला आनंद संस्थेतर्फे शास्त्रीय गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकालीन रागांच्या या अपूर्व मैफिलीने जणू काही आकाशालाही रंगाची उधळण करायला लावली होती. मंजुषा पाटील-कुलकर्णी यांनी मुलतानी राग गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली आणि गर्दीने भरलेले सारे सभागृह सुरांमध्ये न्हाऊन निघाले. मुलतानी या रागातील एकतालात ‘तुम बिन मानत नाही जियरा मोरा’ ही बंदीश सादर झाल्यानंतर मध्यलय आणि तीनतालातील ‘नैनन मे आन बान’ ही बंदीश सादर झाली. त्यानंतर द्रूत एकतालातील ‘गोकुल गाव के छोरा’ ही बंदीश अतिशय उत्तम प्रकारे मंजुषा यांनी सादर केली. मुळातच कलाकार जेव्हा क लेशी एकरूप होतात, त्यावेळी ती कलाही त्यांच्याशी एकरूप होते आणि वातावरणात ऊर्जा निर्माण करते. मंजुषा कुलकर्णी यांनी जेव्हा केदार राग आळवण्यास सुरुवात केली, त्याच वेळी योगायोगाने वाऱ्याची सुंदर झुळूक आली. जणू काही निसर्गालाही दाद देण्याचा मोह आवरला नाही, असे मत रसिकांनी व्यक्त केले. यावेळी केदार रागामधील विलंबित तीलवाडा तालातील ‘बन बनरा’ या गाण्याला रसिकांनी भरभरून दाद दिली तर मध्यलय तीनतालातील ‘कान्हा रे नंद नंदन’ हे गाणे सादर केले. सावन या गीत प्रकारातील ‘अबके सावन घर आजा’ हे दीपचंदी तालातील गाणे सादर झाल्यानंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. या टाळ्या गळ्यातील आवाजाला तर होत्याच पण तबल्याची साथ देणाऱ्या हातातील जादुभरी बोटांनाही होत्या. तबल्यावर साथ देणारे विजय घाटे आणि संवादिनीवर साथ देणारे अनंत जोशी यांनीही रसिकांना खिळवून ठेवले होते. त्यानंतर सोहोनी राग आणि तीन तालाच्या साथीवर ‘बेख बेख मन ललचाये’ या गाण्याचे सादरीकरण झाले. यावेळी विजय घाटे यांनी वाजविलेल्या नादाने एक ज्येष्ठ नागरिक भारावून गेले आणि कार्यक्रमदरम्यानच त्यांचा भ्रमणध्वनी मागावयास गेले. सहयोग सभागृह रसिकांच्या गर्दीने तुडुंब भरले होते. अगदी सभागृहाबाहेरही रसिक उभे राहून मैफलीचा आनंद घेत होते. भरभरून दाद देणारे जाणकार रसिक असतील, तर कलावंतांचाही हुरूप वाढून मैफल विलक्षण रंगते. शनिवारी त्याचा प्रत्यय आला.
ज्येष्ठ नागरिकांनीही पूर्णवेळ उभे राहून कार्यक्रम ऐकला व मोठय़ा प्रमाणात दाद दिली. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणे भैरवीने होते. या मैफलीची अखेरही भैरवी राग आणि दादरा तालातील ‘रंगी सारी गुलाबी चुनरीया मोहमारे नजरीया सावरीया’ या गाण्याने झाली. विशेष म्हणजे कार्यक्रम संपला तरीही प्रेक्षक मात्र हलायला तयार नव्हते. कार्यक्रम संपला असे दोन वेळा कलाकारांनी सांगितल्यानंतर त्यांची खात्री पटली. त्यानंतर कलाकरांभोवती रसिकांनी गर्दी केली होती.