scorecardresearch

ठाणे : नववर्षानिमित्त शहापूर जवळील माहुली किल्ल्यावर शंभुदुर्ग प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम

ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ माहुली किल्ल्याचे दर्शन होते. इतिहास काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण काही दिवस या किल्ल्यावर गेले अशी इतिहासात नोंद आहे.

ठाणे : नववर्षानिमित्त शहापूर जवळील माहुली किल्ल्यावर शंभुदुर्ग प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम
शहापूर जवळील माहुली किल्ल्यावर शंभुदुर्ग प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम

नवीन वर्षाचे औचित्य साधून शंभुदुर्ग प्रतिष्ठानच्या तरुण सदस्यांनी शहापूर जवळील माहुली किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली. गडावरील झुडपे, गवत, पर्यटकांमुळे तयार झालेला कचरा काढून जाळण्यात आला.

हेही वाचा- ठाणे : कल्याण डोंबिवलीत १०२ तळीरामांवर वाहतूक विभागाची कारवाई; तीन लाख २८ हजारांचा दंड वसूल

गडाच्या तटबंदीला पावसाळ्यात शेवाळ चढले होते. यामुळे गडाचा दर्शनी भाग विद्रुप दिसत होता. हा दर्शनी भाग तरुणांनी शिड्या लावून साफ केला. पायऱ्यांवरील उगवलेले गवत काढण्यात आले. दिशादर्शक फलक लावण्यात आले. नवीन वर्ष म्हणजे केवळ मौजमजा करण्याचा दिवस नाही तर या दिवशी काही सामाजिक विधायक काम करुन एक चांगला संदेश समाजात देता येतो, हा विचार करुन मागील काही वर्ष शंभुदुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदेश चौधरी दरवर्षी प्रतिष्ठानमधील सदस्य तरुणांना संघटित गड, किल्ल्यांवर सफाई मोहीम राबवितात.

ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळ माहुली किल्ल्याचे दर्शन होते. इतिहास काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण काही दिवस या किल्ल्यावर गेले अशी इतिहासात नोंद आहे. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने, पुरातत्व विभागाने पुढाकार घ्यावा. त्यांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी शंभुदुर्ग प्रतिष्ठान करेल अशा प्रकारचा पत्रव्यवहार शासनाकडे करण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद मिळत नाही, अशी खंत चौधरी यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- कल्याण : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी नाराज

राज्याच्या विविध भागातून इतिहासाचे अभ्यासत, पर्यटक, दुर्गभ्रमंतीकार माहुली किल्ल्यावर नियमित येतात. या पर्यटकांना किल्ल्यावर प्रसन्न वातावरण असावे या उद्देशातून ही स्वच्छता मोहीम नेहमीच प्रतिष्ठानतर्फे राबविली जाते. शासनाची रीतसर परवानगी घेऊन किल्ल्यावर साफसफाई करण्याची परवानगी मागितली तर ती नाकारली जाते. वन विभागाचे अधिकारीही अशाप्रकारच्या मोहिमेला सहकार्य करत नाहीत. उलट अशी मोहीम सुरू केली तर पोलीस बंदोबस्त घेऊन वनाधिकारी ही मोहीम थांबविण्याचा प्रयत्न करतात, अशी तक्रार अध्यक्ष आदेश चौधरी यांनी केली.

हेही वाचा- डोंबिवलीत गणेश मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी तरुणांची गर्दी

एकीकडे गड, किल्ले यांची जतन करण्यासाठी शासन कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर करते. त्याचवेळी सामाजिक संस्था आपल्या बळाने किल्ले संवर्धनाचे काम करत असतील तर त्यात अडथळा आणून शासन काय साध्य करते, असा प्रश्न चौधरी यांनी केला. राज्याच्या विविध भागातील दुर्गप्रेमींनी यापुढे शासनाकडून अशाप्रकारचा अडथळा किल्ले साफसफाईत आणण्यात आला तर आंदोलन उभारण्याचा निर्धार राज्यातील दुर्गप्रेमींनी केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 12:24 IST

संबंधित बातम्या