scorecardresearch

कल्याण : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी नाराज

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्यालयीन वेळ वेळेत गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना उशिरा लोकल धावण्याचा फटका बसला.

कल्याण : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल उशिरा धावत असल्याने प्रवासी नाराज
संग्रहित छायाचित्र

कल्याण : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्यालयीन वेळ वेळेत गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना उशिरा लोकल धावण्याचा फटका बसला. सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या हळू आणि जलद गती मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्याने वर्षाची सुरुवात वेळेत कार्यालयात जाऊन करू म्हणून मोठ्या उमेदीने घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर आल्यावर लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे दिसले. त्यामुळे नेहमीप्रमाणे त्रागा करत लोकलची वाट पाहत बघण्याची वेळ प्रवाशांवर आली. जलद गती मार्गावरील लोकल उशिरा धावत असल्याने प्रवाशांनी धिम्या गती मार्गावरील लोकल पकडून प्रवास करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रवाशांना धिम्या गती मार्गावरील लोकल उशिराने धावत असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा >>> डोंबिवलीत गणेश मंदिरात गणपतीच्या दर्शनासाठी तरुणांची गर्दी

अनेक प्रवाशांनी समाज माध्यमांमधून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकल उशिराने धावत असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणले. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद प्रवाशांना मिळाला नाही. लोकल उशिरा धावण्याचे कारण विचारण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकल उशिरा धावत असल्याने आता वर्षभर हाच अनुभव पाहायला मिळतो की काय या विचाराने प्रवाशांचा पोटात भीतीचा गोळा आला आहे. लोकल उशिरा धावत असल्याने टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, ठाणे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.

हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीत मंडप साहित्याला आग, अनोळखी इसमाने आग लावली

डोंबिवलीतील प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी सांगितले, नवीन वर्षाचा पहिला दिवस, कामावर जाण्याचा पहिला दिवस त्यामुळे रेल्वे प्रशासनाने किमान पहिल्या दिवशी तरी लोकल वेळेत धावतील असे नियोजन करणे आवश्यक होते. उशिरा धावण्याची काही तांत्रिक अडचण असेल तर ते स्पष्ट करणे आवश्यक होते. असे काही दिसून आले नाही. आपण स्वता लोकल उशिरा धावत असल्याचे निदर्शनास येताच रेल्वेच्या वरिष्ठांना कळविले. प्रतिसाद मिळाला नाही, असे अभ्यंकर यांनी सांगितले. कसारा, आसनगाव भागातील प्रवासी लोकल नियमित उशिरा धावत असल्याने संतप्त आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 10:57 IST

संबंधित बातम्या