बदलापूरः उल्हास नदीवर वरच्या भागात धरणांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे बदलापुरच्या पुराचा प्रश्न कमी होईल. त्याचसोबत नदी खोलीकरण आणि गाळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक त्या गोष्टी केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी फडणवीस आले होते. त्यावेळी शहरातील रखडलेली पाणी योजना, मेट्रो १४, उड्डाणपूल अशा सर्व विषयांवर तात्काळ दिलासा देण्याचेही आश्वासन बोलताना दिले.

बदलापूर शहराच्या पश्चिमेला उल्हास नदी किनारी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी किसन कथोरे यांनी रस्ते, मेट्रो १४, महामार्गांचे सेवा रस्ते, रखडलेली पाणी योजना, सॅटीस प्रकल्प, उड्डाणपुलांचे रखडलेले काम अशा विविध प्रश्नांची यादीच फडणवीस यांच्यासमोर वाचून दाखवली. त्याचवेळी बदलापूर शहराला शिवकालीन शहराचा दर्जा देण्याचीही मागणी त्यांनी केली.

पूररेषेच्या मुद्द्यावर दिलासा देण्याची महत्वाची मागणी कथोरे यांनी केली. त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच उल्हास नदीवर धरणांची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पुराचा धोका कमी होईल. तसेच नदीच्या खोलीकरण आणि गोळ काढण्याच्या कामासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. मात्र उल्हास नदीचे प्रदुषण रोखण्याची गरज असून नदीत मिसळणारे नाले आणि प्रवाह रोखून त्या पाण्यावर प्रक्रिया करा. नदी निर्मल करा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केली. तर अन्य प्रकल्पांवरही तातडीने पाऊले उचलण्याचे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिले. बदलापुरसारख्या ऐतिहासिक शहरात महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी लाडक्या बहिणींच्या हस्ते फडणवीसांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यांच्यामुळेच विरोधकांचा सुफडा साफ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना लाडक्या बहिणींचे आभार मानले. बहिणींचे असे प्रेम मिळाले की सगळ्यांचा सुफडा साफ झाला. ज्यांच्यामागे आई, बहिण आणि मुलीची ताकद त्यांचे कुणीही वाकडे करू शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कथोरे मंत्र्यांपेक्षा मोठे

किसन कथोरे यांना पाचव्यांदा आमदार झाल्यानंतरही मंत्रीपद मिळाले नसल्याची खंत एका भाजप पदाधिकाऱ्याने या कार्यक्रमात व्यक्त केली. त्यावर बोलताना कथोरे मंत्र्यांपेक्षा कमी आहेत काय, जे मंत्री करू शकत नाही ते कथोरे करू शकतात. पण ते योग्यवेळी नक्कीच मंत्री होतील. आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री त्यांच्या पाठीशी उभा आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.