scorecardresearch

Gudhi Padva 2023: “गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा” म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगितला नव्या वर्षाचा संकल्प; म्हणाले…!

गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शोभायात्रेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

cm eknath shinde

गेल्या दोन वर्षांपासून इतर सणांप्रमाणेच गुढी पाडव्यावर आणि मुंबई-उपनगरांत निघणाऱ्या शोभायात्रांवर करोनाचं सावट होतं. त्यामुळे सण साजरे करण्यावर मर्यादा होत्या. गेल्या वर्षी करोनाचं संकट ओसरल्यानंतर निर्बंध काढून टाकण्यात आले. या पार्श्वभूमीवर यंदा मराठी नववर्ष अर्थात गुढी पाडव्याचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विशेषत: मुंबई आणि उपनगरांसह राज्याच्या अनेक भागांत काढल्या जाणाऱ्या शोभायात्रा करोनाआधीच्या वर्षांप्रमाणे पुन्हा एकदा उत्साहात काढल्या जात आहेत. ठाण्यातील शोभायात्रेत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाल्यामुळे ठाणेकरांचा आनंद दुणावल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं.

राज्याच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुढी पाडव्याचा उत्साह व्यक्त करण्यात येतो. उपनगरांसह अनेक भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात येतात. या शोभायात्रांमधून अनेक सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर संदेश देण्याचं काम केलं जातं. तसंच काहीसं चित्र यंदाही नाशिक, ठाणे, डोंबिवली आणि इतर भागांमध्ये दिसून आलं. भल्या सकाळी ठाणेकर, डोंबिवलीकर या यात्रांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. विशेषत: तरुणाईचा उत्साह या शोभायात्रांचं विशेष आकर्षण ठरत आहे.

बुलेटवर स्वार नऊवारीतील तरुणी, डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यावर फेटा अशी बाईक रॅली या शोभायात्रांमधल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक असते. दरवर्षी अशा प्रकारे रॅली काढली जाते. यंदाही या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पारंपरिक वेशभूषा करून तरुण मोठ्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.

मुख्यमंत्र्यांचा सहभाग आणि ठाणेकरांचा उत्साह!

ठाण्यातल्या शोभायात्रेमध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाल्यामुळे ठाणेकरांचा उत्साह अधिकच वाढला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ठाण्यातल्या कोपिनेश्वर मंदिरातही त्यांनी दर्शन घेतलं. “मी गुढी पाडवा आणि हिंदू नववर्षाच्या महाराष्ट्रवासीयांना शुभेच्छा देतो. सगळ्यांना नवीन वर्ष सुखा-समाधानाचं आणि आरोग्यदायी जावो. करोनामुळे आपल्या सणांवर निर्बंध आणि मर्यादा होत्या. पण आपल्या सरकारने ते उठवल्यानंतर गोविंदा, दहीहंडी, गणपती, नवरात्रौत्सव, दिवाळी असे सगळे सण महाराष्ट्राच्या जनतेनं जल्लोषात पार पाडले. आजचा गुढी पाडवाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी जनता सहभागी झाली आहे. हजारो ठाणेकर नागरिकही सहभागी झाले आहेत. अनेक चित्ररथ यात्रेत आहेत. यापूर्वीच्या शोभायात्रेपेक्षा दुप्पट उत्साह नागरिकांमध्ये दिसतोय”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“मी गेली अनेक वर्षं या शोभायात्रेत न चुकता सहभागी होतो. यावर्षी मुख्यमंत्री म्हणून या शोभायात्रेत सहभागी होण्याचा मला आनंद आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

नव्या वर्षाचा संकल्प काय?

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा आणि सरकारचा नव्या वर्षाचा संकल्पही सांगितला. “सरकारचा नव्या वर्षाचा संकल्प आपण अर्थसंकल्पात पाहिलेला आहे. या राज्याचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. सर्व घटकांना न्याय देण्याचं काम अर्थसंकल्पात केलं आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरुणाई अशा सगळ्यांचा विचार आपण केला आहे”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 08:16 IST

संबंधित बातम्या