पालिका मुख्यालयासमोरच्या रस्त्यावर मुख्यमंत्र्यांची आज सभा
ठाणे शहरातील निवडणुकांचा आखाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेंट्रल मैदानात न्यायालयाच्या आदेशामुळे तर गावदेवी मैदानात शांतता क्षेत्रामुळे जाहीर सभा घेण्यास बंदी असल्याने यंदाही राज्यातील प्रमुख नेत्यांच्या सभा रस्ते अडवूनच होणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून निवडणुकांच्या प्रचारकरिता जाहीर सभा घेण्यासाठी राजकीय पक्षांना मैदानेच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही रस्ते अडवून सभा होणार असून शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा अशाचप्रकारे रस्त्यावरच होणार आहे.
ठाणे शहरातील सेंट्रल मैदानात बडय़ा राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा झाल्या आहेत. त्यामध्ये शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बसपाच्या नेत्या मायावती या नेत्यांचा समावेश आहे. प्रचार सभांमुळे हे मैदान निवडणुकांचा आखाडा म्हणून ओळखले जायचे. क्रिकेटव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कार्यक्रमांसाठी मैदान देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने काही वर्षांपूर्वी दिले. या आदेशानंतर जाहीर सभांसाठी मैदान द्यायचे नाही, असा निर्णय मैदान व्यवस्थापनाने घेतला असून यामुळे गेल्या काही वर्षांपासून या मैदानातील प्रचार सभांच्या तोफा थंडावल्याचे चित्र आहे.
सेंट्रल मैदानाप्रमाणेच गावदेवी मैदानातही निवडणुकांच्या प्रचार सभा व्हायच्या. मात्र, आसपासच्या रुग्णालयामुळे मैदानाचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणीही गेल्या काही वर्षांपासून जाहीर सभा घेण्यास बंदी आहे. जांभळीनाका परिसरात एक मैदान उपलब्ध आहे. मात्र, हे मैदान लहान असल्यामुळे त्या ठिकाणी नेत्यांना जाहीर सभा घेणे शक्य होत नाही. या तीन मैदानांव्यतिरिक्त शहराच्या मध्यवर्ती भागात मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बडय़ा नेत्यांच्या सभांना मैदाने मिळत नसून ते शहरातील रस्त्यावरच जाहीर सभा घेत असल्याचे चित्र आहे.
यंदाही विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी राजकीय पक्षांना मैदान मिळत नसल्यामुळे त्यांच्या सभा रस्त्यावरच होणार असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्य़ात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. त्यापैकी ठाणे शहरातील सभा ही महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर होणार आहे.
महापालिकेसमोरील रस्त्याचा ‘आखाडा’
राजकीय पक्षांना गडकरी रंगायतन परिसरातील रस्त्यावर जाहीर सभा घेण्यासाठी परवानगी दिली जात होती. मात्र, या भागात शाळा असल्यामुळे हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला. यामुळे लोकसभा निवडणुकीपासून महापालिकेसमोरील रस्त्यावर जाहीर सभा घेण्यासाठी परवानगी दिली जात असून यंदाही या ठिकाणी सर्वच पक्षांच्या जाहीर सभा होणार आहेत.