‘मुंब्रा पॅटर्न’चे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

ठाणे : करोना नियंत्रणासाठी ठाणे शहरात सुरू असलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त करत असतानाच मुंब्रा परिसरात या साथीवर नियंत्रण मिळवणाऱ्या महापालिकेच्या पथकाचे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. मुंब्रा, भिवंडी यांसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात रुग्णसंख्या शून्यावर आणण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, त्याचा अभ्यास करून धारावीप्रमाणे करोना नियंत्रणाचा ‘मुंब्रा पॅटर्न’ इतरही भागात राबविता येईल का याची चाचपणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या करोना नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी सायंकाळी ठाणे महापालिका मुख्यालयात या तीनही महापालिकांमधील प्रशासकीय प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या पहिल्या टप्प्यात ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शहरातील रुग्णसंख्या, प्रभावित परिसर तसेच नियंत्रणाखाली येत असलेल्या परिसरांची माहिती यावेळी सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मुख्य सचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करोना नियंत्रणाचा ‘मुंब्रा पॅटर्न’ समजून घेण्याचा प्रयत्न केला. ठाणे महापालिका हद्दीत प्रभाग स्तरावर काम करणारे सहाय्यक आयुक्त तसेच मुंब्रा भागात कार्यरत असणाऱ्या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यावेळी कामांची माहिती दिली. घरोघरी जाऊन केलेल्या तपासण्या, स्थानिक डॉक्टरांमार्फत केल्या गेलेल्या चाचण्या, प्रतिजन चाचण्यांची वाढवलेली संख्या, अलगीकरणाची राबविलेली मोहीम यासंबंधीची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर महापालिकेच्या ‘मुंब्रा पॅटर्न’चे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचे कौतूक केले. धारावीप्रमाणे मुंब्रा भागात करोना नियंत्रणासाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेचा सविस्तर अभ्यास करून दाट लोकवस्ती असलेल्या इतर भागातही हा पॅटर्न अमलात आणला जावा, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.