ठाणे- अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत बदलापूर येथे राहणाऱ्या सहवैमानिकाचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. परंतु, माझ्या भावाचा अजूनही फोन सुरू असल्यामुळे तो सुरक्षित आहे अशी आशा त्याच्या कुटुंबाला आहे.
अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरूवारी अपघात झाला आणि सुमारे २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे वर्तविले जात आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. परंतु या विमान दुर्घटनेत बदलापूर येथील दीपक पाठक या सहवैमाणिकाचा समावेश असल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्याच्या कुटुंबाशी माध्यमांनी संवाद साधला असता, दीपक याचा फोन अद्याप सुरू आहे त्यामुळे आम्ही सध्या तरी कोणतेही तर्कवितर्क लावणार नाही.
आम्हाला अजूनही आशा आहे की दीपक जिवंत आहे. दीपक गेले अकरा वर्षापासून एअर इंडिया मध्ये कार्यरत आहेत. कुठेही जाण्याआधी तो पहिला कॉल घरी करत असेल त्यानंतर तो निघायचा आज देखील त्याचा कॉल आला होता. आताही आम्ही त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहोत त्याला रिंग जातेय. परंतु समोरून प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे आम्हाला अजूनही आशा आहे की, दीपक जिवंत आहे. जोपर्यंत आम्हाला अधिकृतरित्या काही कळत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, अशी माहिती दीपक यांच्या कुटुंबाने दिली.