कल्याण – शासन निर्णयाप्रमाणे पालिकेने १५ ऑगस्ट रोजी शहरातील कत्तलखाने, मटण मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनातील मंत्र्यांसह, लोकप्रतिनिधी, विविध स्तरातून टीका होत असताना पालिका प्रशासन हा बंदी आदेश मागे घेण्यास तयार नसल्याने कल्याण जिल्हा काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी पालिकेने हटवादी भूमिका कायम ठेऊन आपला निर्णय मागे घेतला नाहीतर, ट्रकभर कोंबड्या आणून त्या १५ ऑगस्ट रोजी पालिकेच्या आवारात सोडल्या जातील, असा इशारा माध्यमांशी बोलताना दिला.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आहे. या स्वातंत्र्यदिनी पालिका आपल्या हद्दीतील नागरिकांच्या मटण खाण्यावर बंदी आणणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. कोणी काय खावे आणि खाऊ नये हे जर पालिका ठरवू लागली तर नागरिकांनी राहायचे कसे, असा प्रश्न पोटे यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सारखी हेअर कट सर्वांनी ठेवावी, असा अजब फतवा उद्या निघाला तर नागरिकांनी त्याचे पालन करायचे का. तशी केशरचना झालीच नाहीतर मग नागरिकांनी काय करायचे. हुकुमशाही असलेल्या उत्तर कोरियात नागरिकांनी आपली केशरचना कशी असावी याविषयी नियम केला आहे. त्या केशरचनेत नागरिकांनी आपले केस कापून घ्यायचे आहेत, ठेवायचे आहेत. त्यात बदल होता कामा नये. म्हणजे उत्तर कोरियाच्या निर्णयाची आता कल्याण डोंबिवली पालिकेत थेट अंमलबजावणी होऊ लागली आहे. हे आश्चर्यकारक आहे, असे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले.
हिंदु खाटिक समाज संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा असेच सर्वांचे मत झाले आहे. अशाप्रकारे बंदी आणून प्रशासन या व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान करत आहे. पालिकेने आपला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी पालिकेच्या प्रवेशव्दारावर मटण मांस विक्रीची दुकाने सुरू केली जातील. आणि ट्रकभर कोंबड्या आणून त्या पालिका मुख्यालयाच्या आवारात सोडल्या जातील, असा इशारा कल्याण जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिला आहे.
मनसेचा इशारा
कल्याण, डोंबिवली शहरात खड्डे, वाहन कोंडी असे अनेक प्रश्न दलदलीसारखे पडून आहेत. हे विषय मार्गी लावण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी पुढाकार घ्यावा. अनाठायी विषयात आयुक्तांनी आपली शक्ती खर्च करू नये. पालिका हद्दीत १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने, मटण मांस विक्री बंद राहणार आहे. आणि ही विक्री सुरू राहिली तर कोंबड्या, मटण जप्त करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. अशाप्रकारे हे मटण, तेथील कोंबड्या जप्त करून पालिका पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा विचार करत आहे का, तेही एकदा जाहीर करावे, असे आवाहन मनसेचे डोंबिवली माजी शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केले आहे.
प्रशासनाने तात्काळ हा निर्णय मागे घेण्याची मागणी घरत यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार गटाने बंदी मागे घेतली नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला आहे.