कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयातील आपत्कालीन विभागात नियुक्त असलेले लेखा व वित्त विभागातील वरिष्ठ लिपिक योगेश पाटील यांना आयुक्त अभिनव गोयल यांनी बुधवारी सकाळी तडकाफडकी निलंबित केले. आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे रमतगमत, आपत्कालीन विभागात कर्तव्य असताना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पालिका वैद्यकीय आरोग्य विभागातील अनागोंदी, कल्याण पूर्वेत मंगळवारी धोकादायक इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. या सगळ्या प्रकारांमुळे आयुक्त अभिनव गोयल समपदस्थ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना कामात तत्पर आणि सतर्कत राहण्याच्या सूचना करत आहेत. पालिका प्रशासनावर यापूर्वी कोणीही वचक ठेवला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तीचा अभाव असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे.

बुधवारी सकाळी कल्याण मधील पालिका मुख्यालयात आपत्कालीन विभागाची बैठक होती. आयुक्त अभिनव गोयल सकाळी साडे नऊ वाजता पालिकेत आले. ते आपल्या दालनात जाण्यापूर्वी कोणालाही पूर्वसूचना न देता पालिका मुख्यालयातील आपत्कालीन विभागात तेथे नियुक्त केलेले कर्मचारी कार्यरत आहेत की हे पाहण्यासाठी गेले. आपत्कालीन विभागात गेल्यानंतर तेथे एक एक शिपाई आणि कर्मचारी आढळला. अन्य कर्मचारी कोठे आहेत असे प्रश्न आयुक्तांनी केले. त्यावेळी कर्मचाऱ्यांची बोबडी वळली. या विभागात बुधवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत लेखा विभागातील योगेश यादव पाटील या वरिष्ठ लिपिक कर्मचाऱ्याची नियुक्ती होती. सहा वाजण्याचे कर्तव्य असताना ते साडे नऊ वाजून गेले तरी आले नाहीत. यामुळे आयुक्त संतप्त झाले.

दिलेले कर्तव्य योगेश यादव पाटील यांनी पार पाडले नाही. कार्यालयीन शिस्तीचा हा भंग आहे, असा ठपका ठेवत आयुक्त गोयल यांनी महाराष्ट्र नागरी सेवा व शिस्त नियमाने योगेश पाटील यांना तडकाफडकी पालिका सेवेतून निलंबित केले. यावेळी आयुक्तांनी आपत्कालीन विभागातील इतर दोन कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. आता पावसाचे दिवस आहेत. अचानक पूर आला. कोठे आग लागली, कोठे बांधकाम कोसळले तर तुम्ही दोन कर्मचारी काय करणार, असा प्रश्नांचा भडिमार आयुक्त गोयल यांनी आपत्कालीन विभागातील कर्मचाऱ्यांवर केला. आयुक्तांचा रूद्रावतार बघून दोन्ही कर्मचारी हादरले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपत्कालीन विभागात उपायुक्तांपासून ते लिपिक, साहाय्यक आयुक्त, शिपाई या सर्वांच्या पुढील चार महिने आयुक्तांनी नियुक्त्या केल्या आहेत. अनेक कर्मचारी, अधिकारी या विभागात कर्तव्य असताना कर्तव्यावर येण्यास टाळाटाळ करतात. अनेक कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यांची या कारवाईने भंबेरी उडाली आहे. आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून आपल्या शिस्तप्रिय आणि कठोर शिस्तीचे दर्शन घडविण्यास सुरुवात केल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही कर्मचारी आपले कर्तव्य टाळण्यासाठी प्रदीर्घ रजेवर गेले आहेत. त्यांचाही समाचार आयुक्तांनी घेण्याची नागरिकांची मागणी आहे.