ठाणे : भिवंडी शहरातील अनेक रस्ते, पदपथ आणि मुख्य बाजारपेठामध्ये हातगाड्या, ठेलागाड्या, बाकडे, स्टॉल ठेवून अतिक्रमण करण्यात आले असून या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच पदपथावरून चालणे शक्य होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त अनमोल सागर यांनी शहरातील रस्ते, पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना बैठकीत दिले आहेत. या आदेशानंतर पथकाने कारवाई सुरू केली आहे.

भिवंडी निजामपूर शहर महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आयुक्त अनमोल सागर यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याशिवाय, आर्थिक संकटात असलेल्या भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या करवसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे. पालिका तिजोरीत जमा होणाऱ्या करातून चंगल्या नागरी सुविधा कशा पुरविता येतील, याचा विचार सुरू केला आहे. याशिवाय, शहर स्वच्छतेवर भर देण्यास सुरुवात केली असून यासाठी शहरातील व्यापारी संघटना तसेच नागरिकांच्या बैठका घेत आहेत. त्यापाठोपाठ आता त्यांनी शहरातील अनेक रस्ते, पदपथ आणि मुख्य बाजारपेठामध्ये हातगाड्या, ठेलागाड्या, बाकडे, स्टॉल ठेवून करण्यात आलेल्या अतिक्रमयाविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.

आयुक्तांचे आदेश अन् कारवाई सुरू

भिवंडी शहरातील अनेक रस्ते, पदपथ आणि मुख्य बाजारपेठामध्ये हातगाड्या, ठेलागाड्या, बाकडे, स्टॉल ठेवून अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच पदपथावरून चालणे शक्य होत नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत तक्रारी येताच आयुक्त अनमोल सागर यांनी अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. यामध्ये महापालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ क्षेत्रातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मुख्य बाजारपेठा याठिकाणी ठिकाणी असणारे अतिक्रमण, अनधिकृत हातगाड्या, ठेलागाड्या, बाकडे, स्टॉल, पदपथावर अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले फलक, अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स यावर आयुक्त सागर यांनी कारवाईचे आदेश दिले. या आदेशानंतर शहरात तातडीने कारवाई सुरू झाली आहे.

कारवाई कुठे झाली

प्रभाग समिती क्रमांक १ हद्दीमधील बागे फिरदोस समोरील पेट्रोलपंप पासून खंडूपाडा रोड ते तय्यब मस्जिद पर्यंत अवचित पाडा, प्रभाग समिती क्रमांक २ हद्दीमधील साईबाबा नाका, अरिहंत सिटी, एस. के.एन. विट भट्टी, रणजीत नाईक घर ते साईबाबा मंदिर, प्रभाग समिती क्रमांक ३ हद्दीमधील धामणकरनाका मुख्य रस्ता तसेच बी.एन.एन कॉलेज रस्ता पुढे पद्मानगर वॉटर सप्लायकडे जाणारा रस्ता, कामतघर शिवसेना कार्यालय, गणेशनगर, अंजुरफाटा, शुभशांती रेल्वे स्टेशन रोड, प्रभाग समिती क्रमांक ४ हद्दीमधील सारिका हॉटेल, ठाणा रोड ते धामणकर नाका ते रतन टॉकीज रोड व धामणकर नाका उड्डाणपुलाखालील पदपथावर ठेवण्यात आलेल्या १७० अतिक्रमणे पथकाने कारवाई करून तेथील साहित्य मनपा भांडारगृहात जमा केले, अशी माहिती भिवंडी निजामपुर शहर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिक्रमण स्वतःहून काढून टाका

पालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या निर्देशान्वये रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांवर नियमितपणे कारवाई करण्यात येणार आहे. तरी अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावे असे आवाहन उपायुक्त विक्रम दराडे यांनी केले आहे.