ठाणे : ठाणे शहरापाठोपाठ आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील बांधकामांवर हातोडा पडणार असून तशी सूचना भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर (Anmol Sagar ) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिली. यामुळे भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आयुक्त सागर यांनी बांधकामांबाबत महत्वाचे पाऊल उचलत अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.
गेल्या काही वर्षात ठाणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेने शीळ भागातील २१ इमारतींसह एकूण १५१ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत. तसेच या बांधकामांचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. तसेच अनधिकृत बांधकामांमध्ये घर का घेऊ नये, याचे कारण जाहिरातीद्वारर सांगत पालिका नागरिकांना सावध करत आहे. आता अशाच प्रकारची कारवाई ठाणे शहरालगत असलेल्या भिवंडी महापालिका क्षेत्रात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पालिका मुख्यालयात नुकतीच अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
आयुक्तांनी दिली ताकीद
आढावा बैठकीस अतिक्रमण निष्कासन विभागाचे उपायुक्त विक्रम दराडे, अतिक्रमण निष्कासन विभागाचे नियंत्रण अधिकारी अरविंद घुगरे तसेच प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ चे बिट निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीमध्ये आयुक्त अनमोल सागर यांनी महापालिका हद्दीत होत असलेल्या बांधकामांबाबत नाराजी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिकेवर दिलेल्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करून, अनधिकृत बांधकामांवर निष्कासन कारवाईचे निर्देश संबंधितांना दिले. यापुढे कोणतेही अनधिकृत बांधकाम होणार नाही तसेच सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामे तातडीने थांबवून त्यावर निष्कासनाची कारवाई करणेबाबतची दक्षता पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा संबंधितांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल, अशी स्पष्ट ताकीद यावेळी आयुक्तांनी दिली.
कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल
यापूर्वी झालेली काही बांधकामे नियमित करता येत असतील तर नियमानुसार दंड आकारून नियमित करणेबाबत प्रस्ताव सहायक संचालक, नगररचना विभाग यांच्याकडे सादर करावा. अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती हटविताना, वेळोवेळी दिलेल्या सुचनांनुसार पोलीस विभागाशी समन्वय साधून, पर्याप्त बंदोबस्त उपलब्ध करून घेणेबाबत योग्य ते नियोजन करावे, तसेच प्रभाग स्तरावर अनधिकृत आणि धोकादायक इमारतींवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा साप्ताहिक अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. ही सर्व कामे आणि आदेशांबाबत उपायुक्त विक्रम दराडे यांनी वरील सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवून, त्याचा वेळोवेळी आढावा घेण्याचे आदेश देखील आयुक्तांनी यावेळी दिले.
प्रत्येकी प्रभागात दर महिन्याला दोन बांधकामांवर कारवाई
भिवंडीत २०२२ पासून एकूण २९१ अनधिकृत बांधकामे झाली असून त्यावर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त सागर यांनी यावेळी दिले. तसेच दर महिन्याला प्रत्येकी प्रभागात किमान २ अनधिकृत बांधकामांवर पूर्णतः निष्कासनाची कारवाई करणेचे उद्दिष्ट संबंधितांना त्यांनी दिले आहे. तसेच आता प्रभागात बिट निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी अतिरीक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.