कॉमन जेझबेल हे मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. ही फुलपाखरं एलो किंवा व्हाइट या सर्वसाधारण नावाने ओळखली जातात. कॉमन जेझबेल फुलपाखरू हे झाडांच्या वर उडत असतं. जमिनीवर किंवा कमी उंचीवर उडताना ही फुलपाखरं फार क्वचितच दिसतात. याचं कारण म्हणजे या फुलपाखरांच्या अळ्या या आंब्याच्या किंवा इतर झाडांवरची बांडगुळांची पाने खाऊन वाढतात. शिवाय फुलपाखरं उंचीवर येणाऱ्या फुलांमधील मध पितात. त्यामुळे फार कमी वेळा त्यांना जमिनीवर यावं लागतं. या सर्वाचा परिणाम कॉमन जेझबेल फुलपाखरांच्या पंखांच्या रंगसंगतीमध्ये झालेला दिसतो. एरवी फुलपाखरांचे पंख पाठीकडे गडद आणि पोटाच्या किंवा खालच्या बाजूला फिक्कट रंगाचे असतात. कॉमन जेझबेलमध्ये मात्र अगदी उलट असतं. पंखांचा वरचा भाग फिक्कट पिवळा असतो तर खालच्या बाजूचा भडक पिवळ्या, काळ्या आणि लाल रंगांचे पट्टे असतात. यांचे गडद रंग सगळ्या भक्ष्यकांना सूचना देत असतात की आमच्या वाटेला जाऊ नका. तरीही एखाद्या पक्ष्याने यांना खाण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला त्रास होणार हे निश्चित. एकदा का असा त्रास झाला की पक्षी पुन्हा या फुलपाखरांच्या वाटेला जात नाहीत.
कॉमन जेझबेल फुलपाखरू इतर फुलपाखरांसारखे पंख उघडून न बसता पंख मिटून बसतं आणि आपल्या गडद रंगांची सूचना सर्वाना देते. संपूर्ण भारतभर ही फुलपाखरं आपल्याला पहायला मिळतात. अगदी समुद्रसपाटीपासून ७०००/८००० फुट उंच पर्वतरांगामध्ये जिथे जिथे झाडे आहेत, अशा सर्व ठिकाणी ही फुलपाखरं असतात. अगदी वाळवंटी प्रदेश सोडले तर
भारतात प्रत्येक ठिकाणी यांचं अस्तित्व नोंदवलं गेलं आहे.
कॉमन जेझबेल फुलपाखराची मादी झाडांच्या पानाच्या मागील बाजूस १० ते २०च्या संख्येत अंडी घालते. साधारणत: ऑगस्ट महिन्यापासून या फुलपाखरांच्या अळ्या आपल्या भक्ष्य वनस्पतींवर दिसायला लागतात आणि बांडगुळांच्या पानांवर आपला उदरनिर्वाह सुरू करतात. खाण्याची कमतरता जाणवली तर या अळ्या/सुरवंट आपली कोषामध्ये जाण्याची वेळ पुढे ढकलतात. कित्येकदा झाडांच्या पानांवर हालचाल न करता या पिक्कट करडय़ा रंगाच्या अळ्या पडून असतात. परंतु झाडाची जोरात हालचाल झाली किंवा धोका जाणवला तर क्षणार्धात आपल्या शरीरामधून रेशमी धागा सोडून हवेत लोंबकळायला लागतात. काही प्रकारच्या माशा या अळ्यांना शोधून त्यांना भक्ष्य बनवतात आणि त्यांच्यावर ताव मारतात. आंब्यावर किंवा तत्सम इतर झाडांवरती असणारी/वाढणारी बांडगूळ हा एक मोठा चिंतेचा विषय. ती काढणे हे एक अवघड काम असतं. पण या बांडगुळांना कॉमन जेझबेल फुलपाखरं आपलं भक्ष्य बनवतात आणि म्हणूनच या परजीवी वनस्पतींचा नाश करण्यासाठी कॉमन जेझबेलचा वापर जैविक हत्यार म्हणून केला जाऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2016 रोजी प्रकाशित
फुलपाखरांच्या जगात : कॉमन जेझबेल
कॉमन जेझबेल हे मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. ही फुलपाखरं एलो किंवा व्हाइट या सर्वसाधारण नावाने ओळखली जातात.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 10-02-2016 at 07:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Common jezebel a medium sized pierid butterfly