प्रवेश सोहळ्यामुळे राष्ट्रवादीतही अस्वस्थता

कलानी कुटुंबीयांची एकंदर राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता पाच वर्षांपूवी भाजपने अगदी लपत-छपतच ओमी कलानी यांच्या समर्थकांना पक्षाची तिकीटे दिली.

|| जयेश सामंत

उल्हासनगरातील राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेशी संघर्ष वाढण्याची शक्यता

ठाणे : राज्यातील सत्तेचे आणि गृहखात्याचे वारे ज्या दिशेने वाहतील त्या शिडाचे सुकाणू हाती धरण्यात पटाईत मानल्या जाणाऱ्या उल्हासनगरातील कलानी कुटुंबीयांना स्वगृही आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने येत्या काळात जिल्ह्यात होणाऱ्या महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीतील संघर्षही वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

    एकहाती सत्ता असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच अंबरनाथ, बदलापुरात आघाडीच्या चर्चेत राष्ट्रवादीपुढे अजिबात मान तुकवायची नाही असा पवित्रा शिवसेनेचे स्थानिक नेते घेऊ लागले असून नवी मुंबई आणि उल्हासनगरात मात्र आघाडीनेच निवडणुका लढवाव्यात असा मतप्रवाह पक्षात वाढू लागला आहे. उल्हासनगरातील राजकीय घडामोडीनंतर येत्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादीत नगरसेवकांच्या फोडाफोडीचे राजकारणही तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

कलानी कुटुंबीयांची एकंदर राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता पाच वर्षांपूवी भाजपने अगदी लपत-छपतच ओमी कलानी यांच्या समर्थकांना पक्षाची तिकीटे दिली. मुंबई, ठाण्याच्या निवडणुकीवर कलानी प्रवेशाचा परिणाम होऊ नये यासाठी उल्हासनगरात पक्ष प्रवेशाचा कोणताही मोठा सोहळा होणार नाही याची दक्षता भाजप नेत्यांनी अखेरपर्यंत घेतली होती. भाजप-कलानीची ही जवळीक पुढे शिवसेनेनेच उघड केली आणि निवडणुकांच्या प्रचारात अगदी मोदी-शहांपासून देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठवली. खुनाचा आरोप असलेले पप्पू कलानी गेल्या काही दिवसांपासून पॅरोलवर बाहेर आहेत. शहरातील गल्लीबोळात ते बैठका घेत आहेत, तसेच पूर्वीप्रमाणे ‘पप्पूराज्य’ प्रस्थापित व्हावे यासाठी लोकांपुढे जोगवा मागताना दिसत आहेत. इतके सगळे होत असताना शिवसेनेने अगदी ठरवून पप्पू यांच्यापासून अंतर ठेवले होते. राष्ट्रवादीचे नेते कलानी यांच्या बैठका घेत असताना शिवसेनेने कलानी कुटुंबीयांपासून ठेवलेले सुरक्षीत अंतराचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कलानी स्वगृही परतल्याने स्थानिक राजकारणात भाजपला धक्का बसला असला तरी भविष्यात आघाडीची चर्चा झाली तर शिवसेनेने शहरातील मराठीबहुत मतदारसंघांवरील आपला हक्क कायम ठेवला आहे. कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या  निवडणुकांना सामोरे जात असताना कलानी यांच्यापासून जितके अंतर ठेवता येईल, तेवढे ते ठेवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटात सुरू असून बुधवारी राष्ट्रवादीने ठाण्यात घडविलेला प्रवेशाच्या सोहळ्यामुळे राष्ट्रवादीतील एका मोठ्या गटात अस्वस्थता आहे.

ठाणे, डोंबिवलीत शिवसेना आक्रमक

महापालिकांच्या आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढण्याची भाषा या पक्षांचे नेते करत असले तरी ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत मात्र शिवसेनेचे नेते कमालिचे आक्रमक झाले आहेत. गृहनिमाण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा, मुंब्रा मतदारसंघात लस महोत्सव भरवून शिवसेनेने राष्ट्रवादीला आव्हान देण्याची रणनीती आखली असून कल्याण-डोंबिवलीतही जागा वाटपात राष्ट्रवादीचे फारसे ऐकायचे नाही, असाच सूर पक्षात आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी आघाडी करावी असा पक्षात सूर असून उल्हासनगरातही मराठीबहुल पट्ट्यातील जागांवर शिवसेनेकडून दावा सांगितला जाणार आहे. या घडामोडी लक्षात घेऊन येत्या काळात भाजप तसेच इतर पक्षांचे नगरसेवक गळाला लावण्याची जोरदार स्पर्धा शिवसेना, राष्ट्रवादीत रंगण्याची चिन्हे आहेत.

उल्हासनगरात दिवंगत ज्योती कलानी आमदार होत्या. त्यामुळे त्यांचा तिथे जनाधार आहे. त्यांची सून पंचम कलानी यांनी भाजपचे महापौरपद भूषविले होते. त्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व दिलेले नसून केवळ शहराचे नेतृत्व सोपविले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा इतर शहरातील राजकारणावर परिणाम होईल असे म्हणणे योग्य नाही.  – आनंद परांजपे, जिल्हा समन्वयक राष्ट्रवादी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Conflict with shiv sena is likely to increase after the political developments in ulhasnagar akp

ताज्या बातम्या