अंबरनाथः लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या अंबरनाथ शहर ब्लॉक अध्यक्ष प्रदिप पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काँग्रेसच्या अंतर्गत विरोधामुळे शहर ब्लॉक अध्यक्षपदावरून दूर असलेल्या पाटील यांना काँग्रेसने पुन्हा ते पद बहाल केले आहे. बुधवारी त्यांनी नियुक्ती घोषीत केल्यानंतर अंबरनाथ शहरात पाटील समर्थकांनी आंनदोत्सव साजरा केला. पाटील यांच्यापुढे वर्षभरापासून निर्माण झालेल्या अंतर्गत वादावर तोडगा काढण्याचे आव्हान असेल.
गेल्या वर्षात संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक विरोध पक्षातल्या व्यक्तींना प्रवेश देत समर्थन वाढवण्याचा प्रयत्न शिवसेना शिंदे गटाने केला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या अंबरनाथ शहरातील पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने थेट काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे अंबरनाथ ब्लॉक अध्यक्ष प्रदिप पाटील यांनाच गळाला लावले होते. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अंबरनाथ पश्चिमेतील त्यांच्या प्रभाव क्षेत्रात फायदा होईल अशी आशा होता.
मात्र त्यांच्या या निर्णयाने अंबरनाथमधील जुन्या काँग्रेस समर्थकांसह अनेकांना धक्का बसला होता. स्थानिक म्हणून ओळख असलेल्या पाटील यांच्या जवळच्या समर्थकांमध्येही या निर्णयामुळे अस्वस्थता होती. अनेक वर्षे शिवसेनाविरूद्ध काम केल्यानंतर अचानक शिवसेनेसाठी काम करणे अनेकांना पटले नव्हते. त्यामुळे पाटील जरी शिवसेना शिंदे गटात गेले असले तरी त्यांच्या अनेक समर्थकांनी मात्र शिवसेनेपासून सुरक्षित अंतर ठेवले होते. लोकसभा निवडणुकीनंतर पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. मात्र त्यानंतर त्यांना त्याचे मुळ शहर ब्लॉक अध्यक्षपद मिळाले नव्हते. त्या पदावर नव्या चेहऱ्याची नियुक्ती झाली होती.
त्यामुळे पाटील यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवधन सपकाळ यांनी नियुक्ती झाल्यानंतर नव्याने केलेल्या प्रक्रियेत प्रदिप पाटील यांची अंबरनाथ ब्लॉक अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यायात निवड समितीने यासाठी मुलाखती घेतल्या होत्या. या निवडीच्या पत्रानंतर अंबरनाथमध्ये पाटील समर्थकांनी आनंद साजरा केला. पाटील यांना येत्या १५ दिवसात नविन कार्यकारिणी तयार करावी लागणार आहे.
या निवडीनंतर प्रदिप पाटील यांनी माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस वरिष्ठांचे आभार मानले आहेत. शहरातील अतंर्गत वाद मिटवून नव्या जोमाने काम करू असेही पाटील म्हणाले आहेत. पाटील यांच्या शिवसेनेतील काळात झालेल्या नव्या नियुक्त्या आणि नेमलेल्या व्यक्तींच्या अंतर्गत वादाला पाटील यांना सामोपचाराने मिटवून पक्ष चालवण्याचे मोठा आव्हान पेलावे लागणार आहे.