ठाणे महापालिकेच्या ढोकाळी प्रभागातील पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीसह काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी ऐनवेळेस नाटय़मयरीत्या माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या भागातील मातब्बर नेते देवराम भोईर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादीचे नेते असले तरी सर्वपक्षीयांचा पाठिंबा मिळविण्यासाठी देवराम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे बालंट आपल्यावर येऊ नये यासाठी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पद्धतशीपणे ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. देवराम यांचे पुत्र संजय भोईर हे ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे निवडून आल्याने मुलाचे पद धोक्यात येऊ नये यासाठीही हे अपक्ष नाटय़ रंगविण्यात आले.

दरम्यान, बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट होताच देवराम यांनी शिवसेना शाखेत जाऊन दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला.