ठाणे : शासन नियमांनुसार, कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर असलेल्या त्या पदावर ३ वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत राहू शकत नाही. पण, ठाणे महापालिकेतील अशा अधिकाऱ्यांची अद्याप बदली झाली नसून ते पालिकेत वर्षानुवर्ष कार्यरत आहेत, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्य राजेश जाधव यांनी केला आहे. तसेच अशा प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यानिमित्ताने ते अधिकारी कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.
ठाणे महापालिकेत राज्य शासनाच्या सेवेतून प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले काही अधिकारी मागील तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून येथे कार्यरत आहेत. शासन नियमांनुसार, कोणताही अधिकारी प्रतिनियुक्तीवर असलेल्या त्या पदावर ३ वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत राहू शकत नाही. ३ वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर अशा अधिकाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे, असे जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.
प्रशासनाच्या पारदर्शकतेवर शंका
प्रतिनियुक्तीवरील अशा अधिकाऱ्यांची अद्याप बदली झाली नसून तेच अधिकारी ठाणे महापालिकेत वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि निर्णय प्रक्रियेवर शंका निर्माण होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, हे अधिकारी कोण आहेत, याची नावे मात्र जाधव यांनी जाहीर केलेली नाहीत.
प्रतिनियुक्तीवर कार्यरत अधिकाऱ्यांची ३ वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांची अन्यत्र बदली करण्यात यावी
अशा प्रतिनियुक्तीवर कार्यरत अधिकाऱ्याऱ्यांची ३ वर्षाची मुदत पूर्ण झाल्यावर शासन नियमांनुसार त्यांची बदली करण्यात यावी, जेणेकरून प्रशासन कार्यपद्धतीत नवी ऊर्जा आणि पारदर्शकता येईल. त्यामुळे राज्य शासन सेवेतून ठाणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कार्यरत अधिकाऱ्यांची ३ वर्षाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्यांची अन्यत्र बदली करण्यात यावी. मागणीची सकारात्मक दखल घेऊन लवकरात लवकर योग्य त्या कार्यवाहीस प्रारंभ करावा, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.