डोंबिवली- डोंबिवलीत प्रवेश करताना जागोजागी कचरा, खड्डे दिसले. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात पाणी, आरोग्य असे गंभीर प्रश्न आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पालक जिल्हा. डोंबिवली त्यांच्या सुपुत्राचा मतदारसंघ आहे. असे असुनही येथील लोकांची ही अवस्था. एवढी मोठी पदे मिळाली असुनही तुम्ही चांगले काम करत नाहीत हेच यातून दिसते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे मुख्यमंत्री आणि त्यांच्या खासदार पुत्रावर केली.
हाथ से हाथ जोडे अभियानांतर्गत स्व. राजीव गांधी पुरस्कार वितरणासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल डोंबिवलीत सर्वेश सभागृहात आले होते. यावेळी खा. कुमार केतकर, प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे, जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, नवीन सिंग उपस्थित होते.
हेही वाचा >>> पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेच्या बिल्डरांना नोटीसा; बिल्डरांवरील कारवाईबाबत मात्र स्पष्टता नाही
सहा वाजताचा कार्यक्रम असताना प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्यासह नेते मंडळी दोन तास उशिरा कार्यक्रम स्थळी आली. या उशिराच्या कारणावरुन खा. केतकर यांनी नेते मंडळींचे कान उपटले. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून मोदी पुढे जातील. त्यानंतर तुम्ही दोन तासांनी उशिराने येणार आहात का, असा सवाल करत पुढे जायाचे असेल तर आता वेळेच बंधन पाळलेच पाहिजेत, अशी कानउघडणी खा. केतकर यांनी केली.
मी मुख्यमंत्री व्हावे ही अतिउत्साही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यर्त्यांनी आपल्या मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार निवडून आणण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी. मुख्यमंत्री पदाचा निर्णय श्रेष्ठी घेतील. काँग्रेसचे संख्याबळ वाढले तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार, अशी स्पष्टोक्ती पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हेही वाचा >>> बदलापूरः पहिल्याच पावसात विजेचा लपंडाव, मध्यरात्री आणि पहाटेही वीज गायब झाल्याने नागरिक घामाघुम
बेरोजगारी, महागाईने लोक होरपळली आहेत. अशा परिस्थितीत दोन हजार नोट बदलण्याची नवीन टूम काढण्यात आली. यामुळे लोक पुन्हा हैराण आहेत. दहशतवाद, काळा पैसा संपविण्यासाठी नोटाबंदी उपाय नव्हता हे आता केंद्र सरकारला समजले असेल. आता नोटा बदलता बदलता लोक येत्या काळात प्रधानमंत्र्यांना बदलतील, अशी टीका पटोले यांनी केली. संसदीय मूल्य जपणारे संसद भवन आहे. राष्ट्रपती त्याचे प्रमुख आहेत. या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार असेल तर विरोधी पक्ष या कार्यक्रमाला जातील, असे पटोले म्हणाले. काँग्रेस ही एक चळवळ आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्या. गांधी विचाराच्या लोकांना सोबत घेऊन काँग्रेस मजबूत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे, असे पटोले म्हणाले.