ठाणे : पावसाळ्यात अनेक भागांमध्ये शेवाळ येते आणि तो भाग निसरडा होतो. त्यावरून पाय घसरून अपघात होण्याची भीती असते. अशाच प्रकारे ठाण्यातील कोकणी पाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकजवळ आलेल्या शेवाळामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी काँग्रेसच्या नेत्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करत गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले.

ठाण्यातील कोकणी पाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशिनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकची उभारणी पालिका प्रशासनाने केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्याने हा परिसर हिरवागार आहे. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत अनेक जण येथे फेरफटका मारण्यासाठी येतात. काही जण सायकल ट्रॅकवर सायकल चालवितात. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळी येथे नागरिकांची वर्दळ असते. या भागातील पदपथ आणि सायकल ट्रॅकजवळ आलेल्या शेवाळ आल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेवाळामुळे हा परिसर निसरडे झाला आहे. शेवाळाच्या निसरड्या थरामुळे सकाळी आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडत आहेत. “बदलते ठाणे” अशा घोषणा करणाऱ्या महापालिकेचा या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबतीत पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. याविरोधात आता काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गांधीगिरी स्टाईलने आंदोलन केले.

काँग्रेसचे आंदोलन

नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत, ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हाती घेऊन पदपथ आणि सायकल ट्रॅकची साफसफाई केली. ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचा संदेश दिला. या वेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडत आहे, तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीने काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जात आहे.

नुसत्या जाहिराती नको

प्रशासनाच्या डोळ्यासमोर अपघात होत असूनही कोणतीच कारवाई केली जात नाही. झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी आम्ही ही प्रत्यक्ष कारवाई केली आहे. नुसत्या जाहिराती करून चालणार नाही, नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे, विक्रांत चव्हाण म्हणाले.

विजेत्या अधिकाऱ्याला काँग्रेसकडून बक्षीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर आठ दिवसांत प्रशासनाने पदपथ आणि सायकल ट्रॅक स्वच्छ करून ते चालण्यासाठी योग्य केले नाहीत, तर आम्ही पदपथावरून न घसरता चालण्याची स्पर्धा अधिकाऱ्यांसाठी ठेवणार आहोत. जो अधिकारी न घसरता चालेल त्याला काँग्रेसकडून बक्षीस दिलं जाईल, असे राहुल पिंगळे म्हणाले.