शहापूर: सागर नरेकर

ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण आणि विशेषत: आदिवासी पट्टा कधीकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असे. या भागातून महादू बरोरा हे काँग्रेसच्या तिकिटावर सलग तीन वेळा आमदार झाले. नव्वदीच्या दशकात शिवसेनेचा तरुण चेहरा असलेल्या दौलत दरोडा यांनी हे समीकरण उलटवून लावले. एकदा नव्हे तर सलग दोन वेळा त्यांनी बरोरा यांना अस्मान दाखविल्याने ग्रामीण पट्टय़ातील हा साधा शिवसैनिक ठाणे जिल्ह्य़ातील नेत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात आणि विशेषत: आदिवासीबहुल पट्टय़ात दरोडा हा शिवसेनेचा चेहरा मानला जायचे. गेल्या काही वर्षांत हे समीकरण पूर्ण बदलून गेले आहे. काँग्रेस परंपरेत वाढलेले आणि गेल्या निवडणुकीत दरोडा यांना अस्मान दाखविणारे महादू बरोरा यांचे पुत्र पांडुरंग यंदा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव शिवसेनेत आले आहेत. तर पक्षाकडून डावलले गेल्याने दौलत दरोडा यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी यंदाही निवडणुकीच्या रिंगणात दिसतील.

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या या मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या जास्त आहे. मुंबई-ठाण्यासारख्या जिल्ह्य़ांची तहान भागवणारा मतदारसंघ म्हणून शहापूर तालुका परिचित आहे. एका बाजूला सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगा, दुसरीकडे कल्याण, मुरबाड, भिवंडीतील तालुक्यांची वेस, तिसऱ्या बाजूला नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्य़ातील सीमेवरील प्रदेश अशा भौगोलिक स्थानावर शहापूर मतदारसंघ पसरला आहे. कातकरी, वारली, ठाकूर, महादेव कोळी, कातोडी अशा आदिवासी जमातींच्या मतदारांचा या मतदारसंघात समावेश आहे. गेल्या चार दशकांत येथील राजकारण दरोडा आणि बरोरा या दोन कुटुंबांभोवतीच फिरताना दिसले. १९८० साली विधानसभेत महादू बरोरा यांनी काँग्रेस पक्षातून विधानसभा गाठली. त्यानंतर सलग तीन वेळा ते आमदार होते. पुढे नव्वदीच्या दशकात दौलत दरोडा यांनी शिवसेनेतून येथे आमदारकी मिळवली. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. आदिवासी पट्टय़ातील आक्रमक शिवसैनिक अशी ओळख त्यांनी मिळवली. २००४च्या निवडणुकीत महादू बरोरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दरोडा यांना पराभूत करत विधानसभा गाठली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दौलत दरोडांनी पुन्हा बरोरा यांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे खेचून आणला.

२०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेला बरे दिवस होते. तरीही दरोडा यांना महादू बरोरा यांचा पुत्र पांडुरंग बरोरा यांच्यासमोर पाच हजार मतांनी पराभव पराभव पत्करावा लागला. तेव्हापासूनच दरोडा यांचा करिष्मा संपल्याची चर्चा या भागात आहे. काँग्रेस परंपरेत वाढलेल्या पाडुरंग बरोरा यांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच शिवसेनेत आणले. बरोरा कुटुंबाशी येथील शिवसैनिकांनी वर्षांनुवर्षे लढा दिला आहे. त्यामुळे हा बदल पचविणे स्थानिक शिवसैनिकांसाठी जड जात असले तरी पालकमंत्री शिंदे यांच्यापुढे ब्र काढण्याची कुणाची टाप नाही. त्यामुळे पांडुरंग बरोरा हेच यंदा शिवसेनेचे उमेदवार असतील अशी शक्यता आहे. एकीकडे बरोरा शिवसेनेतून निवडणूक लढवण्याची शक्यता असताना, दरोडा यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांना पुन्हा आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची चिन्हे बदलली तरी, लढत कायम आहे.

प्रमुख समस्या

मतदारसंघात काही रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र पाण्याचा प्रश्न सोडवण्यास आमदारांना यश आलेले नाही. अतिदुर्गम भागात दरवर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असते. धरणांच्या तालुक्यात धरणाच्या शेजारचा भाग तहानलेला आहे. भावली धरणाचा प्रश्न कागदोपत्री मार्गी लागला आहे. मात्र त्यासाठी अजूनही काही काळ वाट पाहावी लागणार आहे. भातसा धरणातून निघणारा कालवा अद्याप पूर्ण होऊ  शकला नसल्याने सिंचनाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.आरोग्य सुविधांअभावी ग्रामस्थांना दूर दूर भटकावे लागते आहे.उद्योगधंदे पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे रोजगाराचा प्रश्न कायम आहे. खर्डी भागात औद्योगिक वसाहत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पाण्याची अनुपलब्धता, विजेचा प्रश्न समोर उभा ठाकला आहे.

मतदार म्हणतात,

रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा दुर्गम भागापर्यंत पोहोचल्या नाहीत. आसनगावमधील लहान-मोठे उद्योग बाहेर जात आहेत. त्यामुळे किमान खर्डी औद्योगिक वसाहतीसाठी नियोजन करणे गरजेचे आहे. – प्रशांत रोठे, समाजसेवक, वासिंद.

मतदारसंघात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पाण्याअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.  शिक्षण, रोजगार नसल्याने वाईट परिणाम होत आहेत. भातसा कालव्याची देखभाल दुरुस्ती १० वर्षांपासून रखडली आहे. – शरद अवसरे, निवृत्त अभियंता, शहापूर.

मतदारसंघात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी २४५ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ती पूर्ण करत पाणीटंचाईमुक्त मतदारसंघ करायचा आहे. औद्योगिक वसाहत मंजूर असून ती पूर्ण करून रोजगार प्रश्न मिटवायचा आहे.– पांडुरंग बरोरा, आमदार, शहापूर