|| नीलेश पानमंद

भिवंडी महापालिका आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची ताकद वाढली असली तरी या मतदारसंघातून दहा वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीचा उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपामध्ये समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा कुणाला जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली असली तरी गेल्या नऊ वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत शिवसेना गड राखणार की काँग्रेस गड काबीज करणार, हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये मोठय़ा प्रमाणात मुस्लीम मतदार आहेत. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीचे अबू आझमी विजयी झाले. दोन मतदारसंघात विजयी झाल्याने त्यांनी या मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी २०१० मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेचे रुपेश म्हात्रे हे विजयी झाले होते. त्यांनी समाजवादी पार्टीचे फरहान अबू असीम आझमी यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत रुपेश म्हात्रे यांनी पुन्हा विजय मिळविला.

प्रमुख समस्या..

  • भिवंडी पश्चिम मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था आहे.
  • फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्या
  • अनेक भागांमध्ये पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही.
  • सार्वजनिक वाहतुकीसाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नाही.

काँग्रेसची ताकद वाढली

दोन वर्षांपूर्वी झालेल्या भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. भिवंडी महापालिकेतील ९० जागांपैकी ४७ जागा काँग्रेसला मिळाल्या. काँग्रेसचे ४७ पैकी २४ नगरसेवक हे भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील विजयी झाले असले तरी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात मात्र त्यांना २२ हजार मतांनी पिछाडीवर राहावे लागले. या मतदारसंघातील काँग्रेसची ताकद पाहता २२ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळण्याची आशा टावरे यांना होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. हा मतदारसंघ काबीज करण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी सुरू केली आहे.

समाजवादी पार्टीचा दावा

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार रुपेश म्हात्रे यांच्याविरोधात तगडा उमेदवार उभा करण्याची चाचपणी काँग्रेस नेत्यांनी सुरू केली आहे. तसेच मतांचे विभाजन होऊ नये यासाठी समाजवादी पार्टीला आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आघाडीच्या जागावाटपामध्ये भिवंडी पूर्व जागेवर समाजवादी पार्टीने दावा केला आहे. यापूर्वी या मतदारसंघातून समाजवादी पार्टीचा उमेदवार विजयी झाला असून त्याआधारे ही जागा देण्याचा आग्रह समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी धरला आहे. मात्र या मतदारसंघात काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले असल्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ही जागा समाजवादीला सोडू नका, अशी मागणी वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. आघाडीच्या जागावाटपामध्ये ही जागा कुणाला मिळणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मतदार म्हणतात,

भिवंडी शहरातील इतर आमदारांच्या तुलनेत रुपेश म्हात्रे यांचे काम समाधानकारक आहे. मात्र असे असले तरी मतदारसंघात खराब रस्ते आणि मलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न गंभीर आहे. येत्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या आमदाराने शहरातील रस्ते आणि मलनिस्सारण वाहिन्यांची कामे प्रामुख्याने करायला हवीत. – योगेश जाधव, वकील

भिवंडी शहरातील अंतर्गत रस्ते हे मोठय़ा प्रमाणात खराब झाले आहेत. तसेच शहरातील कचरा व्यवस्थापनही योग्य नसल्याने शहर मोठय़ा प्रमाणात बकाल झाले आहे. येत्या पाच वर्षांत आमदारांनी निदान रस्त्यांची सुधारणा करण्याकडे आणि कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायला हवे. – विकी पाटील, साहाय्यक प्राध्यापक, बा. ना. बांदोडकर महाविद्यालय

एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. मात्र महापालिकेची भुयारी गटार योजनेची कामे अपूर्ण असल्यामुळे रस्त्यांची कामे करणे शक्य झालेले नाही. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारणी, मेट्रो प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.     – रुपेश म्हात्रे, आमदार