ठाणे : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार असून या निवडणुकीत मित्र पक्ष युती किंवा आघाडीत लढणार की स्वबळावर लढणार याविषयी वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत. असे असतानाच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाविकास आघाडीविषयी मोठे विधान करत काँग्रेसची आघाडीबाबतची भुमिका स्पष्ट केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील सात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी संघटनात्मक आढावा बैठक गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे सचिव यू. बी. व्यंकटेश, माजी खासदार कुमार केतकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अभय छाजेड, प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर, ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आदी उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसच्या एकूण संघटनात्मक तयारीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत आगामी रणनीती, पक्ष बांधणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत दिशा ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

आघाडी हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग

कोकण विभागात काँग्रेसला काही ठिकाणी आघाडीमुळे मागे जावे लागले. परंतु आघाडी हा राजकीय अपरिहार्यतेचा भाग आहे. मात्र संघटनेचा विस्तार करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. काँग्रेस पक्ष काही ठिकाणी संख्यात्मक दृष्ट्या कमी भासतोय, हे मान्य आहे. मात्र दुसरीकडे देशभरामध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा काँग्रेस विचाराला मिळत आहे. भाजपच्या विरोधात संघर्ष करणारा एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेस हा आहे आणि भविष्यातही हीच भूमिका कायम राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

२०२९ ला परिवर्तन घडेल

काँग्रेस पक्ष हा देशातील एकमेव प्रभावी पर्याय म्हणून उभा राहत असून, राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्षाविरोधात थेट संघर्षाची भूमिका काँग्रेस घेत आहे. विधानसभेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी काँग्रेसचा विचार आज देशभरात जिवंत असून राहुल गांधी हे नेतृत्व समर्थपणे करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जनतेचा मूड बदलतोय आणि त्याचे संकेत आम्हाला मिळत आहेत. २०२९ च्या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखविणार असून २०२९ नंतर देशात परिवर्तन घडणार हे निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

देशाला लागलेली कीड

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आमचे लोकप्रतिनिधी निवडणुक येतील. पण, भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष आमचे लोकप्रतिनिधी फोडण्याचे काम करतील. हा एक आजार आहे आणि देशाला लागलेली कीड आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना दिले आहेत. राज्यस्तरावर काँग्रेस आघाडीचा निर्णय घेणार नाही. युती आणि आघाडीचा धर्म पाळताना काही तडजोडी कराव्या लागतात. त्यामुळे विधानसभा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षित प्रतिनिधित्व करता आले नाही. स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात, या निवडणुकीत युती वा आघाडीचा निर्णय स्थानिक पातळी घेणे गरजेचे असून यानुसार तसे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.